प्रतिनिधी /काणकोण
पर्तगाळी येथील श्री रामनवमी उत्सवाची जोरदार तयारी या ठिकाणी चालू असून येत्या 10 रोजी रामनवमी उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे. दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध जत्रोत्सवांपैकी येथील रामनवमी हा एक उत्सव असून त्यानिमित्ताने या ठिकाणी आकर्षक अशी फेरी भरत असते. 10 रोजी दुपारी होणारा रामजन्म उत्सव, रात्री होणाऱया जत्रोत्सवात भाविकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देतानाच सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी हा उत्सव होत असल्यामुळे पर्तगाळी येथील वातावरण सध्या उत्सवमय झाले आहे.
मठ परंपरेतील 23 वे स्वामी श्रीमद् विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांच्या महानिर्वाणानंतर विद्यमान श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांचा हा पहिलाच उत्सव असून हा जत्रोत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी स्वामी स्वतः लक्ष ठेवून आहेत. जत्रोत्सवाची सुरुवात झाली असून दररोज संध्याकाळी छोटा रथ तसेच पालखी उत्सव असतो. आज 9 रोजी संध्याकाळी या ठिकाणी रथोत्सव आणि पालखी उत्सव, मखरोत्सव होणार असून 10 रोजी मध्यरात्री मुख्य रथोत्सव होणार आहे. सध्या पर्तगाळी मठात भाविकांची गर्दी उसळत असून कर्नाटक, केरळ तसेच गोव्याच्या अन्य भागांतून येणाऱया भाविकांच्या निवासाची सोय करण्याच्या दृष्टीने मठ समितीने आता विशेष लक्ष दिले आहे. मठ परिसरातील जुन्या खोल्यांचे नूतनीकरण त्याचप्रमाणे काही वातानुकूलित अशा नवीन खोल्या उभारण्याचे काम नेटाने सुरू झाले आहे. या ठिकाणच्या भोजन कक्षामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. पूर्वी मठात सुसज्ज अशी गोशाळा होती. त्याच धर्तीवर प्रशस्त अशी गोशाळा उभारण्याच्या दृष्टीने देखील मठ समितीने आता लक्ष दिले आहे.