पर्यटनमंत्री सी. पी. योगेश्वर यांच्या उपस्थितीत बैठक : सेवा पुरविणाऱया कंपन्यांना सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
म्हैसूर शहरात दसरोत्सव कालावधीत पर्यटकांच्या अनुकूलतेसाठी हेलिटुरिझमची व्यवस्था करण्यात येते. आता संपूर्ण राज्यात लवकरच अशी सुविधा उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याकरिता आवश्यक तयारी करण्याची सूचना पर्यटनमंत्री सी. पी. योगेश्वर यांनी हेलिटुरिझम कंपन्यांना दिली आहे.
बेंगळूरच्या ‘कुमारकृपा’ अतिथीगृहात पर्यटनमंत्री सी. पी. योगेश्वर यांच्या नेतृत्वाखाली हेलिटुरिझम सुरू करण्यासंबंधी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत फ्लायबस, चिप्सन आणि थंबी या कंपन्यांनी हेलिटुरिझम सेवा पुरविण्यासंबंधीचे प्रात्यक्षिक दाखविले.
सुरुवातीला राज्यात वापरात असणारे हेलिपॅड आणि विमानतळांचा वापर केला जाणार आहे. इतकेच नव्हे; तर मागणी असणाऱया ठिकाणी त्वरित हेलिपॅड निर्माण करून आवश्यक परवानगी देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर, हुबळी आणि गुलबर्गा जिल्हय़ांमध्ये हेलिटुरिझम सुरू करण्याची सूचना मंत्री योगेश्वर यांनी हेलिटुरिझम कंपन्यांना दिली. यावर सकारात्मक प्रतिसाद देताना कंपन्यांच्या प्रतिनिधींनी राज्य सरकारने प्रवासाचा मार्ग निश्चित केल्यानंतर त्वरित प्रवासी सेवा पुरविण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे.
सहकार्य करण्याचे आश्वासन
हेलिटुरिझमला प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीला होणारे नुकसान भरून देण्याचा आणि इंधन, जीएसटीत सवलत देण्याची विनंती कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी केली. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारशी चर्चा करून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन योगेश्वर यांनी दिले. राज्यातील सर्व मंत्री इतर राज्यांना आणि केंद्रातून राज्यात येणाऱया मंत्र्यांनी हेलिकॉप्टर सेवेचा वापर केल्यास वेळेची बचतही होईल तसेच आपल्याला लाभ होईल, असे मतही हेलिटुरिझम कंपन्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. त्यावर प्रतिक्रिया देताना सी. पी. योगेश्वर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आणि हेलिटुरिझमला आवश्यक असणारी परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी पर्यटन खात्याचे सचिव पंकजकुमार पांडे, संचालक सिंधु बी. रुपेश, केएसटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय शर्मा आणि वन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक कुमार पुष्कर आदी उपस्थित होते.