प्रतिनिधी/ पणजी
या राज्याचा आपण पर्यटनमंत्री आहे. पर्यटनातील समस्या सोडविण्यासाठी आपण समर्थ आहे. आपण कोणाच्याही खात्यात ढवळाढवळ केलेली नाही. माझ्या खात्यात कोणी ढवळाढवळ केलेली मी मुळीच खपवून घेणार नाही. ऑनलाईन बुकिंग प्रकरणी यापूर्वी काढलेला आदेश मुळीच रद्द केला जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी दिला. यामुळे गेल्या 6 महिन्यापूर्वी कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांच्या बरोबरच्या मिटलेल्या वादाला नव्याने तोंड फुटले.
मायकल लोबो यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन पर्यटन विषयक काही मागण्या पेश केल्या होत्या. त्यांनी त्या पत्रकारांशीही उघड केल्या. यावरून आजगावकर फारच संतापले आहेत. त्यांनी मायकल लोबो यांना स्वतःच्या खात्याचाच कारभार सांभाळा. माझ्या खात्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये. आपण मायकल लोबो यांच्या खात्यात हस्तक्षेप केला आहे का? असा सवाल त्यांनी केला.
लोबो आमच्या राज्याचे कीकंपन्यांचे हित पाहणार?
पर्यटन क्षेत्राला काय हवे? काय नको? हे आपल्याला कळते. ऑनलाईनद्वारे गोव्यात हॉटेलांचे आरक्षण चालू होते त्यावर सरकारने विचारपूर्वकच निर्बंध घातले. कारण ऑनलाईनद्वारे बुकिंग करून सरकारचा कोटय़वधीचा महसूल बुडत होता. अनेक हॉटेल्स बेकायदेशीर व्यवहार करून सरकारचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडवित होती. अशा हॉटेल चालकांचे व ऑनलाईन बुकिंग करणाऱया कंपन्यांचे की राज्याचे हित मायकल लोबो पाहणार आहेत का? असा सवाल आजगावकर यांनी केला.
लोबोनी बेकायदा हॉटेल्सविरुद्ध
कधीतरी आवाज उठविला काय?
कळंगूटमध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदा हॉटेल्स आहेत. त्यांच्याविरोधात मायकल लोबो यांनी कधी करवाई करण्यासाठी सरकारकडे विनंती तरी केली होती का? असे अनेक सवाल उपस्थित करून सरकार आपल्या नियोजनात कोणतेही बदल करणार नाही, असा सज्जड इशारा आजगावकर यांनी लोबो यांना दिला.
आपण काही मायकल लोबोसारखा एक दोन वेळा निवडून आलेला आमदार नव्हे. 5 ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलोय. 5 वेळा मंत्रिपदी राहिलेल्याचा अनुभवी आहे. त्यामुळे लोबो यांनी आपल्याला शहाणपण सांगू नये. आपण येथील पर्यटनाचे हित पाहतोय. राज्याचा महसूल कसा वाढीस जाईल व राज्याचे हित आपण अगोदर पाहणार असेही आजगावकर म्हणाले. आजगावकरांच्या या नव्या निवेदनाने आता पुन्हा एकदा लोबो आणि त्यांच्यात कलगीतुरा सुरू होईल, असा अंदाज आहे.