बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी शनिवारी कर्नाटकचे पर्यटनमंत्री सी. टी. रवी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या सूचनेनुसार रवी यांची भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंत्री रवी यांनी ३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे राजीनामा दिला होता, परंतु मुख्यमंत्र्यांनी तो एका महिन्यापेक्षा जास्त काळ राखून ठेवला होता.
रवी यांना २६ सप्टेंबर रोजी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या कारणास्तव त्यांनी ३ ऑक्टोबरला राजीनामा दिला होता. विधानसभा पोटनिवडणुक निकालाच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल वाला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
राजराजेश्वरी नगर आणि सिरा या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी १० नोव्हेंबरला होणार आहे.
रवी यांच्या राजीनाम्याने मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तार करणे सोपे होणार आहे. विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सूचित केले होते.