सुविधा उभारणीसाठी सहकार्याचे आश्वासन
प्रतिनिधी /पणजी
पर्यटन तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी आपल्या दोन दिवसांच्या काणकोण भेटीवेळी वेलवाडा पैंगीण येथील केशव सेवा साधना संचालित श्री परशुराम विद्यार्थी वसतीगृहास आवर्जून सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील समस्यांची माहिती करून घेत व्यवस्थापनाला आवश्यक सहकार्याचे आश्वासन दिले.
व्यवस्थापनाचे अध्यक्ष उदय प्रभुगावकर, पदाधिकारी काशिनाथ वझे, प्रदीप बंदे, मुख्याध्यापक तुकाराम गांवकर तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मंत्री खंवटे यांनी मुद्दामहून वसतीगृहाला भेट दिल्याबद्दल अध्यक्ष प्रभुगांवकर यांनी आभार मानले व मंत्र्यांना भेटवस्तूही प्रदान केली.
उदय प्रभुगांवकर यांनी कोणत्या परिस्थितीत वसतीगृह चालविले जात होते व उदार दात्यांच्या मदतीच्या जोरावर आज कुठवर पोहोचले, त्याची माहिती दिली. सुमारे 35 विद्यार्थी सध्या या वसतीगृहात राहून शिक्षण घेत आहेत. तर आतापर्यंत सुमारे 500 विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. वसतीगृहात सीसीटीव्ही कॅमेरे, जनरेटर, संगणक, पिंटर व इतर साहित्याची उणीव दूर झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे प्रभुगावकर म्हणाले.
मंत्री खंवटे यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवादही साधला. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी काहीही उणीव भासणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्वासन देत व्यवस्थापनाला आवश्यक ते सहकार्य देण्याबाबत आश्वस्त केले. प्रारंभी, प्रभुगांवकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री खंवटे यांचे स्वागत केले.