प्रतिनिधी/ सातारा
सातारा आणि जावली तालुक्याच्या पर्यटनाला चालना देणाऱया कोयना धरणाच्या बॅक वॉटरमध्ये वॉटर स्पोटर्स सुरु करण्याच्या 50 कोटींच्या प्रकल्पास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यामुळे पर्यटन वाढणार आहे, रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. सातारचे प्रांत आणि तहसील कार्यालय हे प्रतापसिंह शेती शाळेच्या लगत असणाऱया शासकीय जागेत येणार आहे. त्यास अजितदादांनी 27 कोटींची तरतूद केली आहे, अशी माहिती देत स्कूबा ड्रायव्हिंग हे पाण्याखालून करायचे असते. ते उदयनराजेंना जमणार नाही, अशीही टीप्पणी आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंच्यावर केली. तसेच बडय़ांची थकबाकी का ठेवली जाते हे पत्रकारांनी शोधावे, का त्यांचे कार्यालय आहे म्हणून हे माझ्याकडून वदवून घेवू नका, असेही त्यांनी सांगितले.
सुरुची निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रराजे बोलत होते. ते म्हणाले, काल अजितदादांनी बजेट सादर केले. बजेट सादर करण्यापूर्वी एक महिना अगोदर त्यांच्याशी बैठक झाली होती. त्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, एमपीडीसीचे अधिकारी, वित्त व नियोजनचे सचिव, पाटबंधारेचे सचिव असे सर्व उच्च स्तरीय अधिकारी उपस्थित होते. यामध्ये कोयना जलाशयामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने कोयना जलाशयात वॉटर स्पोर्ट सुरु करण्याबाबत प्रेझेंटेशन करण्यात आले. सातारा जिह्यात कास परिसरात पर्यटन वाढत चालले आहे. त्यात कोयना जलाशयामध्ये वॉटर स्पोर्ट चालू करु शकतो. त्याकरता एमपीडीसी आणि जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता. अजितदादांनी प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर तातडीने हा प्रकल्प हाती घ्यायचा आहे, अशा सुचना दिल्या. 50 कोटींच्या प्रकल्पास एमटीडीसीने मान्यता दिली. जावली तालुक्यात बामणोली-शेंबडीच्या बाजुला हा प्रकल्प करायचा आहे. सध्या प्रश्न नोकऱयांचा आहे. नोकऱया तरुणांना मिळाल्या पाहिजेत. उद्योग वाढल्याशिवाय नोकऱया मिळणार नाहीत. पर्यटन हाही उद्योग आहे. तालुक्याच्या आणि जिह्याच्या दृष्टीने महत्वकांक्षी प्रकल्प होत आहे. महाबळेश्वर, कासला पर्यटक येतात. राजमार्गचे काम होते आहे. पर्यटकांची संख्या सातारा आणि जावलीमध्ये वाढणार आहे. त्यामुळे जावली आणि सातारा मतदार संघाच्यावतीने मी अजितदादांचे आभार मानतो.
प्रांत अन् तहसील कार्यालयाची इमारत नव्या जागेत
तहसीलदार आणि प्रांत ऑफिस यांचीही गैरसोय होत होती. प्रांत कार्यालयात गेल्यानंतर लोकांना पार्किंगला जागा नाही. उन्हात बसायला लागते. जिह्याच्या ठिकाण असल्याने सुसज्ज इमारत मिळायला पाहिजे, अशी मागणी अजिंतदादांकडे केली होती. तेपण काम अजितदादांनी केले. 27 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रतापसिंह शेती शाळा आहे तेथे शासनाचा प्लॉट आहे तेथे हे कार्यालय होणार आहे. बाकीचे कार्यालय तेथे होणार आहेत. चांगली वास्तू उभी होईल. लोकांची सोय होईल. आज आपण तसीलदार ऑफीसमध्ये असणारी व्यवस्था बघतो. अधिकाऱयांना नीट काम करता येत नाही. लोकांनाही सुविधा मिळत नाही, असेसही त्यांनी सांगितले. पुढे दादांनी सिव्हील हॉस्पिटलसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तालुक्यातील जे काय महत्वकांक्षी प्रकल्प होते ते दादांच्या माध्यमातून आज पूर्णत्वाला गेलेत. काम पुर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
उदयनराजेंना स्कूबा जमणार नाही
उदयनराजेंना स्कूबा ड्रायव्हींगला प्रवेश असेल का असा प्रश्न छेडला असता ते म्हणाले, स्कूबा ड्रायव्हींगला त्यांना प्रवेश नसावा. कारण स्कूबा ड्रायव्हींग हे पाण्याच्या आतून असते. हवेतून नसते, अशी फिरकी आमदार शिवेंद्रराजेंनी घेतली. तसेच रोप वे अगोदर होणार की हा प्रकल्प अगोदर होणार असाही प्रश्न छेडला असता त्यावर शिवेंद्रराजे म्हणाले रोपवेच मला काय माहिती नाही परंतु हा प्रकल्प निश्चित मार्गी लागणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शहरातील गोरगरीबांच्या मागे वसुलीचा तकादा लावला जातो, बडय़ा थकबाकीदारांना मोकळे सोडले जाते असा प्रश्न केला असता त्यावर शिवेंद्रराजे म्हणाले, पत्रकारांनीच शोध पत्रकारिता करावी, का असे केले जाते. कोणाचे ऑफिस थकबाकीदाराच्या हद्दीत आहे म्हणून सुट दिली जाते काय हे माझ्याकडून वदवून नका घेवू. कलगीतुऱयाबाबत छेडले असता मी कधीच सुरुवात करत नाही त्यांच्याकडून सुरुवात होते, अशीही मार्मिक उत्तरे आमदार शिवेंद्रराजेंनी देत उदयराजेंच्यावर निशाणा साधला.
मी जल्लोषात होतो
चार राज्यात निवडणूकांमध्ये भाजपाचा विजय झाला त्यावेळी भाजपाचे साताऱयाचे आमदार, खासदार जल्लोष करताना दिसले नाहीत या प्रश्नावर शिवेंद्रराजे म्हणाले, मी अधिवेशनात होतो. तेथे जल्लोष केला. पण खासदारसाहेबांच खासदारांना विचारा, असे त्यांनी सांगितले.