प्रतिनिधी / कोल्हापूर
जागतिक पर्यटन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित पर्यटन सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते आज भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथील मौनी महाराज मठ येथे चित्र व शिल्प कलेच्या प्रत्यक्षिकाने करण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश आबीटकर, मौनी महाराज पीठ पाटगाव ट्रस्ट चे अध्यक्ष संजय बेनाडीकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक राजन गवस,पंचायत समिती सदस्य सरिता वरंडेकर, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, हिल रायडर्स चे प्रमोद पाटील, क्रेडाई चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, समीट ऍडव्हेंचर्स चे विनोद कांबोज, हेमंत शहा, सरपंच विलास देसाई, तहसीलदार अश्विनी वरुटे-अडसूळ, गट विकास अधिकारी सरिता पवार आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी शाहीर आझाद नायकवडी तसेच चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी दिव्यांग चित्रकार विजय टिपूगडे यांच्यासह सहभागी कलाकारांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या पाटगाव, भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सर्वांसमोर आणण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी प्रशासनाबरोबरच प्रत्येक व्यक्तीने मेहनत घेणं गरजेचं आहे. जिल्ह्यात येणारा ‘पर्यटक हा आपल्या घरचा पाहुणा’ समजून त्यांची काळजी घ्यायला हवी. आपल्याकडील प्रेरणादायी इतिहास, चांगल्या परंपरा, ऐतिहासिक ठिकाणे, अभिमानास्पद संस्कृती, समृद्ध निसर्ग आदी बाबी जगासमोर आणणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर प्रयत्नशील असून आपण सर्वजण मिळून यादृष्टीने प्रयत्न करुया आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
प्रशासकीय कामातून वेळ काढून पर्यटन विकासासाठी झटणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे आमदार आबीटकर यांनी कौतुक करुन ते म्हणाले, विपुल वृक्षसंपदेने नटलेला पाटगाव, कडगाव भाग खऱ्या अर्थाने ऑक्सिजन पार्क आहे. पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून या भागाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच आम्हा सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत.
काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात भुदरगड तालुक्यातून मुंबई-पुण्याकडे जाणारे येथील नागरिक आता याच भागात रोजगार निर्मिती करत आहेत. येथील उपलब्ध साधनसंपदेच्या बळावर महाबळेश्वर, माथेरान प्रमाणे भुदरगड तालुका उत्कृष्ट डेस्टिनेशन म्हणून उदयास येईल, असा विश्वास आमदार श्री आबीटकर यांनी व्यक्त केला.
साहित्यिक राजन गवस म्हणाले, निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला वेगळा आनंद देतात. सुसंस्कृत बनवण्याचं काम निसर्ग करतो. देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याजोगे चित्र-कला दालन पाटगाव परिसरात उभे रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.