प्रतिनिधी/ पणजी
ओल्ड गोवा येथील संत फ्रान्सिस झेवियरचे फेस्त अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. कोरोनाचे संकट आणि त्याचा प्रभाव यामुळे दरवर्षीची गर्दी यंदा दिसली नाही. फेस्ताच्या निमित्ताने भरणारी फेरी, त्यातील दुकाने यंदा नव्हती. फेस्ताचा आनंद यंदा भाविकांना लुटता आला नसल्याने एकंदरीत फेस्तावर कोरोनाचे सावट तसेच विरजण पडल्याचे दिसून आले. दरम्यान फेस्ताच्या मुख्य प्रार्थना सभेत गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी पर्यावरणाची हानी होणार असलेल्या सर्व प्रकल्पांविरोधात जनतेने गप्प न राहता आवाज उठवावा, असे स्पष्टपणे आवाहन केले.
जे प्रकल्प जनतेच्या हिताचे नाहीत तसेच जनतेच्या इच्छेविरूद्ध लादण्यात आले आहेत त्यांना जनतेने विरोध करावा, असेही फेर्रांव यांनी नमूद केले. पुढच्या पिढीचे जतन-संवर्धन न करणारे प्रकल्प नकोत असेही त्यांनी सांगितले. थोडक्यात चालू असलेल्या विविध चळवळी, आंदोलनांकडेच आणि त्यांच्याशी संबंधित विविध प्रकल्पांकडे अंगुली निर्देश केला आहे. फेस्ताच्या मुख्य प्रार्थनासभेत सरकारविरोधी आणि प्रकल्पाविरोधी पडसाद उमटले आहेत. ते सुद्धा आर्चबिशपांनी सभेला जमलेल्या जनतेसमोर स्पष्टपणे बोलून दाखवले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा
झेवियर फेस्तानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, दरवर्षी मोठय़ा उत्साहाने उमेदीने आणि भक्तीभावाने हे फेस्त साजरे केले जाते पण यंदा कोरोनामुळे त्यावर बंधने आली आहेत. अनेकांना फेस्ताला येता-जाता आले नाही. तथापि फेस्ताचे थेट प्रक्षेपण काही चॅनेल्सवर करण्यात आल्यामुळे जनतेला घरी बसून फेस्त पहायला मिळाले. गोमंतकीय जनतेवर सेंट झेवियरांची सदैव कृपादृष्टी लाभो अशी सदिच्छा डॉ. सावंत यांनी प्रकट केली.
कोरोनामुळे अनेक भाविक मुकले फेस्ताला
काल गुरुवारी फेस्ताच्या ठिकाणी वाहनांची, लोकांची गर्दी नव्हती तर पूर्णपणे शांतता आढळून आली.महाराष्ट्र कर्नाटक या शेजारील राज्यातून मोठय़ा प्रमाणात भाविक फेस्ताला येतात. परंतु कोरोना संकटामुळे ते येवू शकले नाहीत. काही भाविक चालत येतात परंतु त्यांनाही हे शक्य झाले नाही.
नाही फेरी, नाही मौज मजा
फेस्ताच्या फेरीत मोठय़ा प्रमाणात दुकाने असायची. तेथे खरेदी व विक्रीसाठी मोठी गर्दी दिसून यायची परंतु यंदाच्या फेस्तातले चित्र मात्र वेगळे होते. दुकाने नाहीत, ग्राहक नाहीत, लोक नाहीत अशा प्रकारे शांत आणि सुने वातावरण तेथे दिसून आले. तेथे भेट देणाऱया किरकोळ लोकांना, पर्यटकांना फेस्त आहे असे जाणवलेच नाही.