ऑनलाईन टीम / पुणे :
जीवनात पर्यावरण आणि विकास यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विकास करीत असताना पर्यावरणाचे संवर्धन आवश्यक आहे. त्यासाठी पर्यावरण आणि विकासाचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (डीईएस) अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले.
डीईएसच्या शंभर शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून निर्मिती करण्यात आलेल्या ‘चला ऐकूया पर्यावरणाची हाक’ या ध्वनिचित्रफितीचे अनावरण शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, विश्वस्त जगदीश कदम. संचालक अड अशोक पलांडे, मिलिंद कांबळे, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, पर्यावरणतज्ज्ञ प्रभाकर बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू छत्रपती पुढे म्हणाले, ‘विकास आणि पर्यावरणात असमतोल निर्माण झाल्यास नैसर्गिक आपत्ती ओढवते. त्यामुळे मोठी जीवीत आणि वित्त हानी होते. म्हणूनच शालेय जीवनातच मुलांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत.’
डॉ. कुंटे म्हणाले, ‘डीईएसचा नेहमीच तात्विक चर्चांना कृतीचा आधार देण्यावर भर असतो. याच हेतूने संस्थेने पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणावर पुस्तके तयार केली. वृक्षारोपण, निसर्गपूजन अशा कृतींमधून पर्यावरण रक्षणाचे संस्कार केले जातात.’
बांदेकर म्हणाले, ‘या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या आधारे पर्यावरणाची मांडणी केली आहे. जगभरात घडत असलेल्या घटनांचा आढावा घेण्यात आला आहे. वसुर्धव कुटंबकमचा संदेश देण्यात आला आहे. व्यक्ती, निसर्ग आणि ब्रम्हांडाचा एकत्रित विचार अभिनय, नृत्य, संगीत आणि कथांच्या माध्यमांतून मांडण्यात आला आहे.’