रामपूर येथील सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे उद्घाटन,
प्रतिनिधी/ चिपळूण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार भास्कर जाधव व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी गुहागर मतदार संघातील बेरोजगार युवक-युवतींसाठी 13 फेबुवारी रोजी सकाळी 10 वाजता रामपूर येथे सुवर्णभास्कर नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाचे उदघाटन युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. या महोत्सवासाठी तब्बल 10 हजारांहून अधिकजणांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत.
गेल वर्षभर कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट संपूर्ण जगावर ओढवले. त्याचे गंभीर परिणाम सर्वच घटकांवर झाले. अनेकांचा रोजगार कोरोनाने हिरावला, उद्योग-व्यवसाय बंद झाले, नोकऱया गेल्या. त्यामुळे शहरांत नोकरी-धंद्यासाठी मोठय़ा संख्येने गेलेला तरूणवर्ग गावाकडे परतला. हाताला काम नसल्याने या सर्वांमध्ये निराशेचे वातावरण आहे. छोटय़ा गावांपासून मोठय़ा शहरांपर्यंत हीच परिस्थिती असताना आपल्या गुहागर मतदार संघातील बेरोजगारांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय आमदार जाधव यांनी घेतला आणि त्यातूनच हा महानोकरी महोत्सव आयोजित केला आहे.
जाधव यांनी मंत्री असताना अशा स्वरूपाचा नोकरी महोत्सव रामपूर हायस्कूलच्या मैदानावर घेतला होता. त्यातून हजारो युवकांना रोजगाराची संधी मिळवून दिली होती. त्यावेळी संधी मिळालेले असंख्य तरूण शिकता शिकता आज इंजिनियरिंग व अन्य क्षेत्रामध्ये चांगल्या पदांवर व वेतनावर कार्यरत आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा नोकरी महोत्सव भरवण्याचे ठरवले. शिवाई प्रतिष्ठान आणि यशस्वी ऍकॅडमी फॉर स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या महोत्सवामध्ये राज्यभरातील 80हून अधिक विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नोंदणी केलेल्या युवक-युवतींच्या मुलाखती घेऊन त्याचठिकाणी त्यांची निवड करून निवडीचे पत्रही तेथेच दिले जाणार आहे.
रामपूर येथील मिलिंद हायस्कूलच्या प्रशस्त मैदानावर सकाळी 9 वाजल्यापासून या महोत्सवाची सुरूवात होणार आहे. शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन आणि त्यांच्याचहस्ते प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेल्या काही युवक-युवतींना निवडीचे पत्र प्रदान करण्यात येणार आहे.