पर्रा सिटीझन फोरमतर्फे सलग आठव्या वर्षी आयोजन
प्रतिनिधी /म्हापसा
शिवोली व कळंगूट मतदारसंघ तसेच अखिल गोवा आकाशकंदील स्पर्धा सलग आठव्या वर्षी पर्रा गावात 23 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रोख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून यात सहभागी होणाऱया स्पर्धकालाही बक्षीस नेता येईल, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी व्यासपीठावर शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, पर्राचे सरपंच चदानंद उर्फ चंदू हरमलकर, उपसरपंच डॅनियल लोबो, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रदीप मोरजकर, अजीत पार्सेकर, शिवराम पार्सेकर तसेच इतर पंच सदस्य उपस्थित होते.
पर्रात आमची परंपरा जीवित ठेवली
पुढे बोलताना आमदार मायकल लोबो म्हणाले की, एकेकाळी दिवाळी सणाच्या निमित्ताने आकाशकंदील अथवा नाताळनिमीत्ताने नक्षत्र बनविण्यासाठी घरातील सर्व मंडळी एकत्रित यायची परंतु सध्या हे दिवस लोप पावल्याचे दिसून येत आहे. मात्र पर्रा सिटीझन फोरमच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या आकाश कंदील स्पर्धेमुळे घरातील तरुण पिढी तसेच वयोवृद्ध माणसे पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीने आकाश कंदील बनविण्यासाठी एकत्रित येतील असा विश्वास कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी यावेळी व्यक्त केला.
अखिल गोवा व शिवोली, कळंगूट मतदारसंघ मर्यादित स्पर्धा
पर्रा येथे पर्रा सिटीझन फोरम असोशियशनतर्फे 23 ऑक्टोबरला आठवी भव्य अखिल गोवा आकाशकंदील प्रदर्शन तसेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन विभागात घेतली जाणार असून प्रथम विभागात राज्यस्तरीय तर दुसर्या विभागात कळंगुट तसेच शिवोली मतदारसंघ मर्यादित स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती फोरमचे अध्यक्ष प्रदीप मोरजकर यांनी सांगितले.
दरम्यान अखिल गोवा आकाशकंदील स्पर्धेत प्रथम पारितोषिक 30 हजार रुपये, द्वितीय 25 हजार, तृतीय 20 हजार, चौथे 15 हजार, पाचवे 12 हजार, सहावे 10 हजार, सातवे 8 हजार आणि नववे सहा हजार तसेच दोन्ही विभागात दहा उत्तेजनार्थ बक्षिसे असतील तर कळंगूट तसेच शिवोली मतदारसंघ मर्यादित स्पर्धेत प्रथम बक्षीस 25 हजार रुपये रोख व इतर बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक रोख बक्षिसाने गौरविण्यात येणार असून स्पर्धेसाठी प्रवेशिका रविवारी दि. 23 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून स्वीकारण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी आपली नावे 9822139319 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. उपसरपंच डॅनियल लोबो यांनी आभार मानले.