वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे पत्रकार डॅनियल पर्ल यांचे अपहरण आणि हत्या करणारा अल् कायदा या इस्लामी दहशतवादी संघटनेचा हस्तक अहमद ओमर सईद शेख आणि त्याचे तीन साथीदार यांच्या सुटकेचा आदेश पाकिस्तानमधील न्यायालयाने दिल्याने अमेरिकेत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गुरूवारी सिंध उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांच्या सुटकेचा आदेश दिला होता.
या सर्व दहशतवाद्यांना पर्ल यांच्या हत्येसंबंधी दोषी धरण्यात आले होते. तसेच त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. मात्र, त्यांची सुटका करण्यात यावी असा आदेश अचानकपणे देण्यात आल्याने अमेरिकेचे प्रशासन नाराज आहे. अमेरिकेने आपली तीव्र नाराजी पाकिस्तानला कळविली असून या निर्णयाविरोधात पावले उचलण्यास पाकिस्तान सरकारला सांगितले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पाकिस्तान सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी सूचना अमेरिकेने केली. या आरोपींच् ााr अद्याप सुटका करण्यात आलेली नाही, असे पाकने अमेरिकेला कळविल्याचे सांगण्यात आले आहे.
मातापित्यांची टीका
डॅनियल पर्ल यांचे मातापिता रूथ आणि ज्युडीया पर्ल यांनी पाक न्यायालयाच्या निर्णयावर कठोर टीका केली. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. उच्च न्यायालयाने अन्याय केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अन्यायकारक असल्याने पाक सरकार त्याविरोधात योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षाही या मातापित्यांनी व्यक्त केली आहे.