क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोवा यॉटिंग संघटनेचे सेलर्स डेन कुयेल्हा आणि पर्ल कोलवाळकर यांनी मुंबईत झालेल्या सीनियर राष्ट्रीय सेलिंग अजिक्यपद स्पर्धेत रौप्यपदके मिळविली. सदर स्पर्धा 2022 आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच 2022 मध्ये होणाऱया आशियाई सेलिंग अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल दोन सेलर्स निवडण्यासाठी होती. डेनने आरएसःएक्स ऑलिम्पिक क्लास गटात रौप्यपदक प्राप्त केले.
डेन आणि कात्या कुयेल्हो यांनी जकार्तात 2018 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय सेलिंग संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. हल्लीच डेन कुयेल्होला राज्य शासनाकडून प्रलंबित असलेले 30 लाखांचे अनुदान देण्यात आले आहे.
पर्ल कोलवाळकरनेही या स्पर्धेतील लेसर रेडीयल क्लास महिला गटात रौप्यपदक मिळविले. 15 वर्षीय पर्लने देशातील अव्वल सेलर्सना झुंज देऊन दुसरे स्थान प्राप्त केले. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेल्या नेथ्रा कुमानन हिला सुवर्णपदक मिळाले. या कामगिरीने पर्ल आता 2022 मध्ये होणाऱया आशियाई सेलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघातील निवडीसाठी प्रबळ दावेदार बनली आहे.