लहान-मोठे अपघात होऊनही संबंधितांचे दुर्लक्ष
विशेष प्रतिनिधी / पर्वरी
पणजी ते म्हापसा महामार्गावर पर्वरी येथे मोटय़ा प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे या ठिकाणी रस्ता ओलांडताना लोकांना तारेवरची कसरत करावी लागते. काही ठिकाणी या रस्त्यावर वाहतूक खात्यातर्फे सिग्नल बसविले आहेत तर काही ठिकाणी सिग्नल बसविलेले नाहीत. पर्वरीतील डीएड कॉलेज समोर मॉल दि गोवा जवळील महामार्गावर सिग्नल नसल्याने वाहनचालक तसेच कॉलेज विद्यार्थ्याना रस्ता ओलांडणे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे तेथे सिग्नल अंत्यत गरजेचा आहे.
पर्वरीतील मॉल दी गोवा व डीएड कॉलेज समोर रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात लोकांची ये जा असते. या ठिकाणी डीएड, बीएड महाविद्यालये शिक्षण खाते, हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालय अशा अनेक शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे विद्यार्थी व इतरांना हा रस्ता ओलांडावा लागतो. सकाळी व संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी गर्दी असल्याने या ठिकाणी सिग्नल अत्यंत गरजेचा आहे.
वाहतूक पोलीस नेमण्याची गरज
राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर वाहनचालकांना दंड ठोठावण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात आहेत. पण ज्या ठिकाणी पोलिसांची अत्यंत गरज आहे, अशा ठिकाणी पोलीस नेमण्यात आलेले नाही. मॉल दी गोवा व डीएड कॉलेज समोरील रस्त्यावर सिग्नल नसल्याने वाहतूक पोलीस असणे गरजेचे आहे.
अपघात होऊनही दुर्लक्ष या ठिकाणी अनेक वेळा अपघात होऊन काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. सरळ रस्ता असल्याने म्हापसा मार्गे पणजीच्या दिशेने वेगाने गाडय़ा येत असतात तसेच या ठिकाणी गतिरोधकही नाही. जर वाहनचाकांनी अचानक गाडी घुसवल्यास वाहनचालकांचा ताबा सुटून आपघात होण्याची शक्यता आहे. असेच अपघात या अगोदर या ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे वाहतूक खाते तसेच सरकाने याची दखल घेणे गरजेचे आहे.