भाजप प्रवक्त्या कुंदा चोडणकर यांचे मत
प्रतिनिधी / म्हापसा
पर्वरी मतदारसंघासाठी भाजपमध्ये उमेदवार असताना आयात उमेदवार करण्याची काहीच गरज नसल्याचे मत भाजपच्या प्रवक्त्या कुंदा चोडणकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
राज्यात भाजपचे सरकार असून या सरकारने लोकांसाठी व महिलांसाठी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, लाडली लक्ष्मी, गृहआधार यासह विविध योजना राबविल्या आहेत. राज्यातील महिलांचा या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. दिल्लीतील पक्ष येथे येऊन आश्वासनांची घोषणा करीत आहे. या पक्षाने कितीही आश्वासने दिली तरीही खरा विश्वास जनतेचा भाजपवरच आहे, असे चोडणकर म्हणाल्या.
पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे भाजप प्रवेश करणार अशी चर्चा सर्वत्र पसरली आहे. मात्र आमच्यामध्ये याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे आपण याबाबत काहीच बोलू शकत नाही. आमच्याकडे उमेदवार असताना आयात उमेदवार करण्याची गरज नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.