पर्वरी/ प्रतिनिधी
खुल्या बाजारात विक्री करण्यास बंदी असलेल्या ‘कॅनाबिस’ औषधाची विक्री करणाऱया येथील ‘कॅनाडॉक क्लिनिक’वर पर्वरी पोलिसांनी काल बुधवारी छापा टाकून क्लिनिकचे मालक अर्जुन खन्ना याच्यावर एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोदविण्यात आला आहे. त्याच्याकडून दोन लाख पंचवीस हजार रुपयांची कॅनाबिसचे 83 बॉक्सेस जप्त केले आहेत.
पर्वरी पोलिसांना कोकेरो हॉटेलजवळील कॅनाडॉक क्लिनिकमध्ये बंदी असलेल्या कॅनाबिस औषधाची विक्री केली जात आहे, अशी माहिती मिळाली होती. त्या माहितीनुसार पर्वरी पोलिसानी त्या क्लिनिकवर छापा टाकला असता त्यांना वेगवेगळी कॅनाबिस औषधे विक्रीस ठेवल्याची दिसली.
बेकायदेशीर विक्री झाली उघड
पोलिसांनी तेथील कर्मचाऱयांना ही औषधे विक्री करण्यासंबंधीची परवानगी कागदपत्रांची मागणी केली असता ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यांच्याकडे ही औषधे विक्री करण्याची कोणतीच कागदपत्रे नसल्याने पोलिसानी तेथील अंदाजे सात किलो माल जप्त केला. बाजारात सद्या त्याची किंमत अंदाजे दोन लाख पंचवीस हजार रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या मालामध्ये विविध प्रकारची चूर्णे आहेत.
मालक अर्जुन खन्नावर गुन्हा
पोलिसानी क्लिनिकचे मालक अर्जुन खन्ना (दिल्ली) याच्यावर एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. हा छापा उत्तर गोवा अधीक्षक शोबीत सक्सेना आणि उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत गावकर, उपनिरीक्षक सीताराम मळीक पोलीस संदीप परब, उत्कर्ष देसाई आणि नेहा देसाई यांनी कारवाई केली.