प्रतिनिधी/ पर्वरी
पर्वरीमध्ये खुनाचे प्रकरण गाजत असतानाच एटीएमच्या चोरीमुळेही खळबळ माजली आहे. आंर्बिना सुकूर येथील युनियन बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरटय़ाने पळवून आतील रोख 19 लाख 3 हजार 400 रुपये चोरून फोडलेले मशीन सुमारे 200 मीटर अंतरावर झाडीत फेकून ते पसार झाले आहेत.
शनिवार-रविवारी पळविले एटीएम मशिन
बँकेच्या व्यवस्थापक प्रभावती हेगडे यांनी पर्वरी पोलीस स्थानकात नोंदविलेल्या तक्रारीत शनिवार 17 रोजी रात्री 9.30 ते रविवार 18 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान अज्ञातांनी एटीएम मशीन घेऊन पळ काढल्याचे नमूद केले आहे.
पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर उपनिरीक्षक प्रतिक भट यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱयाची तपासणी करून धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला असता चोरटय़ांनी सीसीटीव्ही कॅमेऱयाची केबल कापून टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महत्वाचा दुवा नाहिसा झाला आहे.
दोनशे मीटरांवर सापडलेले फोडलेले मशिन
पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली असता बँकेपासून अंदाजे 200 मीटर अंतरावर मशीन फोडलेल्या अवस्थेत सापडले. उपनिरीक्षक भट यांनी घटनास्थळी पंचनामा केला तसेच श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करून धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीन पळवून रोकड लंपास करण्यासाठी 3 ते 4 जणांचा सहभाग असणार, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. कॉरपोरेशन बँकेचे विलिनीकरण युनियन बँकेत करण्यात आले असून नामकरण बदलल्यास अवघे दोन दिवस झाले आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
पर्वरी पोलीस कार्यक्षेत्रात 16 ऑक्टोबर रोजी तोर्ड पाटो येथे वाहनचालकाला पेटवून हल्ला करण्यास 3 ते 4 दिवस उलटले असता एटीएम मशीन पळविण्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे पोलिसांपुढे गुंडगिरी व चोरटय़ांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आहे. निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने एक पथक चोरटय़ांचा शोध घेत आहे. पोलिसांनी एटीएम मशीन ताब्यात घेऊन स्थानकात आणले आहे.