प्रतिनिधी / पणजी
विधिकार दिनाचा कार्यक्रम शनिवार दि. 9 जानेवारी रोजी पर्वरी येथील विधानसभा संकुलात सकाळी 10 वाजल्यापासून आयोजित करण्यात आला असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित रहाणार आहेत. गोवा मुक्तीदिनाच्या 60 व्या वर्षानिमित्ताने हा कार्यक्रम चांगल्या स्वरुपात साजरा करण्याचे ठरवण्यात आले असून एकुण 300 जणांना त्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
सभापती राजेश पाटणेकर यांनी आपल्या पर्वरी विधानसभा संकुलातील दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती देऊन सांगितले की 9 जानेवारीपासून गोव्यात पहिली विधानसभा सुरु झाली विधानसभेचा पहिला दिवस या नात्याने तो विधिकार दिवस म्हणून पाळण्यात येतो. यंदा व्यापक स्वरुपात तो साजरा करण्यात येणार असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु हे प्रमुख पाहुणे असून ते तेथील कार्यक्रमात आजी- माजी आमदारांना मार्गदर्शन करतील असे पाटणेकर यांनी नमूद केले.
विधानसभा अधिवेशन 25 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीत होणार असून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सुटी आहे. सोमवारी 25 जानेवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे तर 27, 28, 29 असे तीन दिवस प्रश्नोत्तरे व इतर कामकाज आहे. शुक्रवारी 29 रोजी खासगी काम काज होणार असून एकंदरीत हे अधिवेशन फक्त चार दिवसांचे आहे असे पाटणेकर यांनी सांगितले.
अधिवेशनासाठी 751 प्रश्न आले असून ते देण्याची मुदत संपुष्टात आली आहे. त्यातील 195 प्रश्न तारांकीत तर 556 प्रश्न अतारांकीत आहेत. कामकाज सल्लागार समितीची बैठक अद्याप झालेली नसून ती येत्या 8 दिवसात होणार आहे. गॅलरीत दर्शकांना प्रवेश द्यायचा की नाही हे त्या बैठकीत निश्चित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.