प्रतिनिधी / पर्वरी
जीसीए मैदानाजवळील पोलीस वसाहतीत राहाणारे साहाय्यक उपनिरीक्षक संतोष आर. सावंत यांनी गुरुवार दि. 4 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वा.च्या सुमारास राहत्या सदनिकेतील बेडरुममधील पंख्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
या प्रकरणी पर्वरी पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. 57 वर्षीय साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सावंत आल्तीनो पणजी येथील राखीव दलात काम करीत होते. मागील काही महिन्यांपासून त्यांची मनस्थिती ठिक नव्हती. प्राप्त माहितीनुसार त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली होती. त्यामुळे ते सतत मानसिक दबावाखाली काम करीत होते. यापूर्वी एकदा त्यांनी आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. परंतु गुरुवारी रात्री खोलीत कोणीही नसल्याची खात्री करुन त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
निरीक्षक निनाद देऊळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताराम मळीक यांनी पंचनामा केला. मृतदेह गोमेकॉत शवचिकित्सेनंतर नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. निवृत्त होण्याच्या वाटेवर असलेल्या संतोष सावंत यांच्या निधनाबद्दल पोलीस वसाहतीत हळहळ व्यक्त होत आहे.