केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे, पण पलक्कडमधील भाजप उमेदवार ई. श्रीधरन स्वतःच्या विजयाबद्दल आश्वस्त असून त्यांनी मतदारसंघात स्वतःचे कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया चालविली आहे.
मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी पलक्कड शहरात भाडेतत्वावर एक घर घेतले असून तेथेच ते कार्यालय सुरू करणार आहेत. पलक्कड शहरात लोकांच्या सेवेसाठी आता उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पलक्कडसह पूर्ण केरळमध्ये 6 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. निवडणूक निकालाबद्दल मी अत्यंत आश्वस्त आहे. याचमुळे निकालापूर्वीच स्वतःचे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी होण्याचा विश्वास आहे. मेट्रोमॅनच्या स्वरुपातील प्रतिमेचा लाभ मिळाला आहे. केरळ विधानसभेत भाजप किंगमेकर ठरणार असून 45 जागांवर विजय मिळविणार असल्याचे 88 वर्षीय श्रीधरन यांचे मानणे आहे. राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होत राष्ट्रपती राजवटी लागू होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे खोचक विधान श्रीधरन यांनी स्वतःचे कार्यालय सुरू केले हे चांगलेच आहे. कारण पलक्कडमध्ये रेल्वेचे अनेक प्रकल्प सुरू होणार असून येथे एका कार्यालयाची गरज भासणार आहे. पलक्कडमधील विद्यमान आमदार शफी पाराम्पील स्वतःचे वर्चस्व कायम ठेवतील, असा दावा काँग्रेस खासदार व्ही.के. श्रीकंदन यांनी केला आहे.