आमदार प्रा. जयंत आसगावकर यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी / वाकरे
महाराष्ट्र राज्यातील पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षण विभागातील ६००० पदांची भरतीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी मागणी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात दिलेली माहिती अशी की सदरची भरतीप्रक्रिया अनेक अडचणींमुळे रखडलेली आहे.त्यामुळे पूर्वीची पदे भरण्यासह नवीन पदे भरण्यास अनेक अडचणी येत आहेत. तरी पवित्र पोर्टल अंतर्गत रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी आमदार आसगावकर यांनी केली आहे.
तसेच २० टक्के अनुदानपात्र शाळा व २० टक्के अनुदान घेणाऱ्या ४० टक्के अनुदानासाठी पात्र शाळा दि.४ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयामध्ये अनुकम्पा १ हजार रुपये टोकण रक्कम दिली असून त्याप्रमाणे वरील शासन निर्णयामध्ये निधी मिळण्याचे आदेश होणे आवश्यक आहे अशीही मागणी आमदार आसगावकर यांनी दुसऱ्या निवेदनाद्वारे केली आहे. तरी २० टक्के अनुदानपात्र शाळा व २० टक्के अनुदान घेणाऱ्या ४० टक्के अनुदानासाठी पात्र शाळांना त्वरित अनुदान देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी श्रेणीतील पदे न भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे.त्यामुळे शालेय स्वच्छता, प्रार्थना, तासिकामधील सुट्टी, शालेय पत्रव्यवहार पोहोच करणे, प्रशासनास व अध्यापनास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणे,विद्यार्थी, पालक समन्वय साधणे इत्यादी कामे करणारा चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग न भरण्याच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
तसेच विविध संघटना आंदोलन करू शकतात, याची दखल घेऊन राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठीचा आकृतीबंध ठरवण्याचा दि.११ डिसेंबर रोजीचा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत विचार करण्याचे आश्वासन मंत्री गायकवाड यांनी दिले आहे.