प्रतिनिधी / सातारा
शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा असल्याने त्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होते. पशुधन हेच शेतकऱ्यांसाठी खरे धन आहे. ते आपण जपले पाहिजे, असे मत सभापती सरिता इंदलकर यांनी व्यक्त केले.
ठोसेघर येथे आयोजित पशुसंवर्धन विभागाच्यावतीने व डी. आर. डी. तसेच स्पायसर इंडिया कंपनीच्या माध्यमातून चाळकेवाडी तील महिला बचत गटांसाठी कुकुट पालन शेळी पालन मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी उपसभापती अरविंद जाध, जिल्हा परिषद सदस्य कमल जाधव, पंचायत समिती सदस्या विद्या देवरे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. वाघ, डॉ. देशपांडे, डॉ. भिसे, स्पायसर कंपनीचे योगेश गाढवे, चाळकेवाडी मुख्याध्यापक डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने दुग्धव्यवसाय डॉ. सुनील देशपांडे, बंदिस्त अर्धबंदिस्त शेळीपालन – डॉ. विजय सावंत, परसातील कुक्कुटपालन- डॉ. संजयकुमार भिसे यांनी मार्गदर्शन केले. सातारा तालुक्यातील दुर्गम भागामध्ये महिला बचत गटांनी पशुपालन हा व्यवसाय व्यवसायिक पद्धतीने करण्यासाठी पुढे यावे, यासाठी महिलांना पंचायत समिती सातारा मार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन सातारा पंचायत समितीच्या सभापती सारिताताई इंदलकर यांनी दिले.
सध्याच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोक रोजगारापासून वंचित झाले आहेत. अशावेळी पशुपालन हा एक उत्तम रोजगार ठरू शकतो व अर्थार्जनाचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, तसेच लोक मोठ्या प्रमाणावर प्रथिनयुक्त आहाराकडे वळाले असून अंडी व मांस यांना मोठ्या प्रमाणावर मागणी उपलब्ध झाली आहे. त्यामुळेच लोकांनी कुक्कुटपालन व शेळीपालन आकडे बघावे असे आवाहन उपसभापती अरविंद जाधव यांनी उपस्थित महिलांना केले. ऑडिओ साधनांचा वापर करून तसेच चर्चात्मक स्वरूपामध्ये महिलांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात उत्तम प्रकारे सहभाग नोंदवला. या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता डॉ. सुयोग वाघ, व्यवस्थापक योगेश गाढवे, डॉ. शरद भिसे, सुरज पवार यांनी नियोजन केले. याकरिता सरपंच चाळके, ज्येष्ठ नागरिक प्रकाश शेळके व सर्व ग्रामस्थ चाळकेवाडी यांनी मोलाचे सहकार्य केले.