नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांची पत्रकार परिषदेत मागणी
प्रतिनिधी/ मडगाव
वेर्णा ते नावेलीपर्यंतच्या पश्चिमी बगलरस्त्याचे सुरू असलेले काम योग्य पद्धतीने होत नसल्याने ते बंद करण्यात आले होते. या रस्त्याच्या सल्लागाराने नावेली येथे उभारण्यात येणाऱया ‘स्टिल्ट’ पुलाची उंची 3.6 मीटर्स ठेवली होती. याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देताच त्यांनी लगेच या पुलाची उंची आमच्या मागणीनुसार 5.50 मीटर्स करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. सदर सल्लागारावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांनी केली आहे.
नावेली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरपंच बेलिंदा गोन्साल्वीस व अन्य उपस्थित होते. सदर सल्लागाराला गुजरातमध्ये काळय़ा यादीत टाकण्यात आलेले आहे, असा दावा फालेरो यांनी केला. असे असतानाही त्याला गोव्यात कोणत्या आधारावर काम करण्यास परवानगी देण्यात आली यासंदर्भात चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या सल्लागाराला आतापर्यंत 64 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत, असाही दावा त्यांनी केला.
मार्च, 2017 मध्ये आपण आमदार झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना वेर्णा ते नावेलीपर्यंतच्या पश्चिमी बगलरस्त्याचे काम योग्य पद्धतीने करण्यात यावे यासाठी पत्र लिहिले होते. कारण हा रस्ता जेथून जातो तो भाग पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. या रस्त्याचे काम करताना काही तलाव बुजविण्याचे काम सुरू झाले होते. त्यामुळे स्थानिकांनी त्याला विरोध केला होता. विरोध करणाऱयांना अटक करण्यात येणार असे तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी बजावले होते. या भागात अनेकांच्या शेतजमिनी असून त्यामुळे अटक करायची असेल, तर आपल्याला करा, असे आपण त्यावेळी सांगितले होते, याची आठवण फालेरो यांनी करून दिली.
त्यानंतर लगेच पर्रीकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांना बोलावून बैठक घेण्यात आली होती. त्यात त्यांनी तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून 180 कोटी रुपयांचे ‘स्टिल्ट’ पूल बांधण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती. त्यांच्यामुळे तसेच अनेकांनी विरोध केल्यामुळे तलावांसह एकंदर पर्यावरणाचे कोणतेही नुकसान न होऊ देता पश्चिमी बगलरस्त्यावर स्टिल्ट पूल बांधण्यात येतील, अशी माहिती फालेरो यांनी दिली.