ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आमदाराचा मृतदेह एका दुकानाबाहेर लटकलेला आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपुर जिल्ह्यात घडली. मृत आमदार हे हेमताबादमधील भाजपचे आमदार असून देवेंद्र नाथ रे असे त्यांचे नाव आहे. भाजपकडून ही हत्या आहे असा आरोप लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार देवेंद्र नाथ यांचे लटकलेला मृतदेह ज्या दुकानाबाहेर आढळला ते ठिकाण त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार काही लोक पहाटे 1 वाजता आले आणि त्यांना बोलावून घेऊन गेले. त्यानतंर सकाळी स्थानिकांना देवेंद्र रे यांचा मृतदेह दुकानाबाहेर लटकलेला आढळला. दरम्यान, कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले की, भाजप आमदार नरेंद्र रे यांची हत्या संशयास्पद आणि नृशंस असून आश्चर्यचकित करणारी आहे. ममता सरकारमध्ये गुंडराज आहे आणि ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे अपयश आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांनी ट्विट करत सांगितले की, भाजप आमदाराचा मृत्यू, हत्येच्या आरोपासह गंभीर मुद्दे उपस्थित करतो. सत्य शोधून काढणे आणि राजकीय हिंसा थांबवण्यासाठी पूर्णपणे नि:ष्पक्ष तपासणीची गरज आहे.