700 किलोमीटर अंतरावरील ऑस्ट्रेलियातून कसे पोहोचले हे रहस्य
पश्चिम बंगालच्या वन अधिकाऱयांनी शुक्रवारी रात्री जलपाईगुडीच्या गजोल्डोबानजीक दोन जखमी कांगारूंना वाचविले आहे. वैंकूठपूर वन प्रभागाच्या अंतर्गत बेलाकोबा वनक्षेत्रात गस्त घालत असताना हे कांगारू सापडल्याची माहिती रेंजर संजय दत्ता यांनी दिली आहे.
दोन्ही कांगारूंच्या शरीरावर काही गंभीर जखमा दिसून आल्याने त्यांना उपचारासाठी त्वरित बंगाल सफारी पार्क येथे हलविण्यात आले. विशेष अधिकाऱयांच्या पथकाने याप्रकरणी तपास सुरू केला आहे. या कांगारूंच्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे, या कांगारूंना कुणी आणि कशाप्रकारे जंगलात आणले हे शोधले जाणार असल्याचे दत्ता म्हणाले.
पश्चिम बंगाल पोलिसांनी मार्च महिन्यात कांगारूंना अवैध स्वरुपात नेण्याच्या आरोपाप्रकरणी हैदराबादच्या दोन जणांना अटक केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 7 हजार किलोमीटरचे अंतर कापून हे कांगारू येथे कसे पोहोचले याचे गूढ कायम आहे.
कांगारू हा ऑस्ट्रेलियात आढळणारा सस्तनधारी प्राणी आहे. तसेच तो ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. हा प्राणी केवळ ऑस्ट्रेलियातच आढळून येतो. कांगारू भारतात आढळून येत नाहीत. केवळ काही प्राणिसंग्रहालयांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे.
जून 2011 मध्ये कोलकात्याच्या अलीपूर प्राणिसंग्रहालयाने चेक प्रजासत्ताकमधून लाल कांगारूंच्या दोन जोडय़ा आणल्या होत्या, परंतु त्या सर्वांचा मृत्यू ओढवला होता. अखेरचा लाल कांगारू ऑक्टोबर 2015 मध्ये मृत्युमुखी पडला होता. त्यानंतर कोलकात्याच्या प्राणिसंग्रहालयाला 2016 मध्ये योकोहामा प्राणिसंग्रहालयाकडून 4 कांगारू प्राप्त झाले होते.