1 ऑक्टोबरपासून यात्रा-उत्सवांनाही अनुमती : सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये 1 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात सर्व सिनेमागृहे, नृत्य, गायनाचे कार्यक्रम आणि जादूचे प्रयोग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, ही परवानगी देताना कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी प्रेक्षकांची संख्या 50 टक्केच असणार आहे. कलाकारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. जनजीवन सामान्य होण्यासाठी यात्रा, नाटक, जादूचे प्रयोग, सिनेमागृहे, संगीत, नृत्य-गायनाचे कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून 50 टक्के उपस्थितीत सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ही परवानगी देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क लावणे तसेच कोरोनापासून बचावाच्या अटींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून सिनेमागृह, नृत्य, गायनाचे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे कलाकारांचे नुकसान होत होते.