कोळसा घोटाळाप्रकरणी 15 ठिकाणी कारवाई
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये कोलकातासह 15 ठिकाणी शुक्रवारी छापे टाकण्यात आले. सीबीआय-ईडीच्या अधिकाऱयांनी संयुक्तपणे हे छापे टाकले. या कारवाईतून कोळसा घोटाळा व पशु तस्करीची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वीच्या कारवाईत सीबीआय-ईडीला मोठय़ा प्रमाणात धागेदोरे हाती लागल्यानेच पुन्हा एकदा सीबीआय-ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. या तपासाच्या माध्यमातून घोटाळेबाज राजकारण्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे. मात्र, शुक्रवारच्या या कारवाईबाबत सविस्तर माहिती देण्यास अधिकाऱयांनी नकार दर्शवला आहे.
दिवसभरात दुर्गापूर, कोलकाता, पुरुलियासह 15 विविध ठिकाणी संशयितांना अटक करून सीबीआय-ईडीच्या धाडी सुरू होत्या. संबंधितांच्या निवासासह कार्यालयांवरही एकाचवेळी छापे टाकण्यात आले. संशयित व्यापाऱयांची कसून चौकशी केली जात आहे.