वाई : वाईहून पाचगणी-महाबळेश्वरकडे व कोकणात जाणाऱ्या पसरणी घाटात दुरुस्तीच्या कामामुळे आज (दि.३०) घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आहे. येथील वाहतूक पाचवड-कुडाळ व नागेवाडी (ता वाई) मार्गाने वळविण्यात आली आहे. घाटात दिवसभर दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पसरणी घाटामधील मोऱ्या व संरक्षक भिंती सततच्या पावसामुळे पडलेल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला असून, त्याची दुरुस्ती करण्याचे काम प्रगतीपथात आहे. सदरचा रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यासाठी मोरीचे बांधकाम व संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी बुधवार सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.