तब्बल 26 उमेदवारांची यादी प्रथम जाहीर होणार : मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष उमेदवारांच्या यादीसह दिल्लीत
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे हे दोघेजण पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी घेऊन दिल्लीत डेरेदाखल झाले असून येत्या एक – दोन दिवसात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, 40 पैकी 26 मतदारसंघातून फक्त एका उमेदवाराचे नाव केंद्रीय संसदीय समितीला सूचित करण्यात आले असून 9 मतदारसंघात दोन – तीन उमेदवारांची नावे समाविष्ट असल्याने तेथे भाजपला बंडखोरीचा धोका सतावत आहे. एकूण 35 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची शिफारस गोवा प्रदेश भाजपतर्फे करण्यात आली असून ती यादी पक्षाच्या संसदीय मंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. तेथे चर्चा होऊन अंतिम उमेदवारास मान्यता दिल्यानंतरच त्यांची यादी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोरीचा धोका नसलेल्या 26 मतदारसंघातील उमेदवारांची यादी प्रथम जाहीर करण्यात येणार असून बंडखोरीची शक्यता असलेल्या 9 मतदारसंघातील उमेदवारांची यादी नंतर जाहीर होणार आहे.