प्रतिनिधी /फोंडा
विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरायला काल शुक्रवार 21 पासून सुरुवात झाली असून फोंडा तालुक्यातून पहिला अर्ज प्रियोळ मतदारसंघातील भाजपा उमेदवार व माजी मंत्री गोविंद गावडे यांनी सादर केला. संकष्ट चतुर्थीच्या मुहुर्तावर सकाळी 11.50 वा. त्यांनी आपली उमेदवारी भरली. फोंडा तालुक्यातील चार मतदारसंघातून उमेदवारी सादर करणारे ते पहिले उमेदवार आहेत.
प्रियोळ मतदारसंघातून मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले गोविंद गावडे यंदा भाजपाच्या तिकीटावर लढणार आहेत. आपले लढाऊ कार्यकर्ते हीच आपली खरी ताकद असून त्यांच्या पाठबळावरच आपण प्रियोळातून पुन्हा विजयी होण्याचा दावा त्यांनी यावेळी केला. मागील निवडणुकीत 4600 मतांच्या आघाडी मिळाली होती, यावेळी भाजपातर्फे लढताना राज्यातील सर्व चाळीसही मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपाच्या तिकीटावर लढताना आपल्याला आनंद होत आहे. भाजप सरकारचा घटक म्हणून गेल्या पाच वर्षात प्रियोळ मतदारसंघाचा विकास करता आला. यापुढेही ही लोकसेवा सुरुच राहणार आहे. पुढील पाच वर्षात युवा वर्गासाठी रोजगार व महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वयंरोजगारावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत बेतकी-खांडोळाचे जि. पं. सदस्य श्रमेश भोसले, प्रियोळ भाजप मंडळाचे अध्यक्ष व बेतकी-खांडोळाचे सरपंच दिलीप नाईक, भोमचे सरपंच सुनील भोमकर, केरीच्या सरपंच अनीशा गावडे, वेरे-वाघुर्मेचे सरपंच सत्यवान शिलकर, वळवईचे उपसरपंच दिगंबर तारी, तिवरे-वरगांवचे पंचसदस्य जयेश नाईक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.