दहावीच्या परीक्षेला सुरळीत सुरुवात : बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 139 केंद्रांवर परीक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात सोमवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 430 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. हिजाबमुळे यावर्षीच्या परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील विविध केंद्रांवर हिजाब घालून विद्यार्थिनी दाखल झाल्या. त्यांना परीक्षा केंद्रात घेऊन हिजाब काढण्यास सांगण्यात आले. त्यामुळे हिजाब न घालता विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. पहिल्या दिवशी एकही विद्यार्थी डिबार झाला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सोमवारी सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर पालकांची गर्दी झाली होती. विद्यार्थी व पालकांमध्येही पहिलाच पेपर असल्याने काहीशी हुरहूर होती. परंतु पेपर देऊन बाहेर पडणाऱया विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर आत्मविश्वास असल्याने पालकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. हिजाब प्रकरणामुळे सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता. परंतु सर्वत्र सुरळीत पद्धतीने दहावीचा पहिला पेपर पार पडला. परीक्षेसाठी 33 हजार 807 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी 33 हजार 274 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 430 विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
परीक्षा केंद्रांवर दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली होती. या कर्मचाऱयांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रिनिंग केले जात होते. आजारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्गात व्यवस्था करण्यात आली होती. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 139 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली. परीक्षा सुरळीत पद्धतीने पार पडण्यासाठी पर्यवेक्षक, जागृती दल, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती.
15 मिनिटे मिळाला अतिरिक्त वेळ
प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी यावषी शिक्षण विभागाकडून 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आला. मागील दोन वर्षांत या विद्यार्थ्यांना परीक्षा लिहिण्याची सवय नसल्यामुळे हा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. या 15 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचावी, असा उद्देश होता. यामुळे प्रश्नपत्रिका सोडविणे विद्यार्थ्यांना सोयीचे ठरले.
परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त
कर्नाटकात हिजाब प्रकरण चांगलेच तापले होते. त्या घटनेचे पडसाद दहावीच्या परीक्षेवर पडू नयेत, यासाठी बेळगाव शहरातील सर्वच परीक्षा केंद्रांवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. संशयास्पद दिसणाऱया व्यक्तींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. परीक्षा केंद्रापासून दूरवरच पालकांना थांबविण्यात आले होते. काही संवेदनशील परीक्षा केंद्रांबाहेर उभ्या असणाऱया पालकांना पोलिसांनी हुसकावून लावले.