प्रतिनिधी/ खानापूर
घरात सुखसमृद्धी नांदावी, धनधान्यांची भरभराट व्हावी यासाठी घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत केले जाते. मंगळवापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून तालुक्यातील महिलावर्ग व कुमारिकांकडून मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
पहाटे स्नान करून पाच झाडांच्या पाच डहाळय़ा आणून कलशात पानविडा, सुपारी, दुर्वा, पोवळे, पैसा आदी पूजेचे साहित्य घालून कलशाची चौरंगावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर कलशाला दागिने आणि फुलांच्या हारांनी सजविण्यात आले. दिवसभर फलाहार करून सायंकाळी श्री महालक्ष्मी देवीला पंच पक्वान्नांबरोबरच गोड पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. देवीच्या व्रत कथेचे कथन करून आरती करण्यात आली. यावेळी समस्त महिलावर्गाकडून आई महालक्ष्मी घरात सुखशांती नांदू दे, घराची भरभराट होऊ दे अशी मनोकामना करण्यात आली. यानंतर हास्यविनोद करीत पंचपक्वान्नांचा आस्वाद घेत मार्गशीर्षातील पहिला गुरुवार घरोघरी आनंदी वातावरणात साजरा झाला.