विंडीजवर 133 धावांनी मात, स्टार्कचे 5 बळी, कॅरेचे अर्धशतक, पोलार्डची एकाकी लढत
वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
हंगामी कर्णधार ऍलेक्स कॅरेचे अर्धशतक, वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क व हॅझलवूड यांच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान विंडीजवर 133 धावांनी दणदणीत विजय मिळविला. पाच बळी टिपणाऱया स्टार्कला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
ऑस्ट्रेलियाने 49 षटकांत 9 बाद 252 धावा जमविल्या असताना पावसाचा एकूण तीनदा व्यत्यय आल्याने विंडीजला डकवर्थ-लुईस पद्धतीच्या आधारे 257 धावांचे सुधारित उद्दिष्ट मिळाले. या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीजचा डाव स्टार्क व हॅझलवूड यांच्या भेदक माऱयापुढे 26.2 षटकांत केवळ 123 धावांतच कोलमडला. फक्त कर्णधार पोलार्डने (56 धावा) एकाकी लढत देत अर्धशतक नोंदवले. स्टार्कने 48 धावांत 5 बळी टिपले, त्यात पोलार्डचाही समावेश होता. जोश हॅझलवूडनेही प्रभावी मारा करीत 6 षटकांत 11 धावा देत 3 बळी मिळविले. ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
नियमित कर्णधार ऍरॉन फिंच जखमी असल्याने कॅरेने या सामन्यात नेतृत्व केले. प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने बऱयापैकी सुरुवात केली. जोश फिलिप (39), बेन मॅकडरमॉट (28), मिशेल मार्श (20) यांनी सुरुवात चांगली केली. पण मोठय़ा खेळीत त्याचे त्यांना रूपांतर करता आले नाही. मात्र कर्णधार कॅरेने अर्धशतकी खेळी करताना 87 चेंडूत 67 धावा जमविल्या. त्याने ऍश्टन टर्नरसमवेत (49) पाचव्या गडय़ासाठी 104 धावांची भागीदारी केली. ही जोडी 45 व्या षटकात बाद झाल्यानंतर हेडन वॉल्शच्या फिरकीसमोर 4 बाद 218 वरून 9 बाद 247 असा त्यांचा डाव गडगडला. वॉल्शने केवळ 16 चेंडूत 5 बळी मिळविले. पाच बळी मिळविण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. पराभव झाला असला तरी कर्णधार पोलार्डने आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीची कौतुक केले. पण गचाळ क्षेत्ररक्षण झाल्याने ऑस्ट्रेलियाला किमान 25 धावा फुकट बहाल केल्याचेही त्याने मान्य केले. दुसरा सामना 23 जुलै रोजी याच मैदानावर होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 49 षटकांत 9 बाद 252 ः जोश फिलिप 39 (42 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), मॅकडरमॉट 28 (48 चेंडूत 2 चौकार), मार्श 20 (22 चेंडूत 3 चौकार), हेन्रिक्स 7, कॅरे 67 (87 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), ऍश्टन टर्नर 49 (45 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), वेड 3, स्टार्क 8, झाम्पा नाबाद 12, वेस ऍगर 9, हॅझलवूड नाबाद 1, अवांतर 9. गोलंदाजी ः हेडन वॉल्श 5-39, अल्झारी जोसेफ 2-40, अकील हुसेन 2-50.
विंडीज 26.2 षटकांत सर्व बाद 123 ः हेतमेयर 11, पोलार्ड 56 (57 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), अल्झारी जोसेफ 17 (33 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), वॉल्श 20 (26 चेंडूत 4 चौकार), अवांतर 11. गोलंदाजी ः स्टार्क 5-48, हॅझलवूड 3-11, झाम्पा 1-39, मार्श 1-7.