पुरुष टेनिसपटूंसाठी नावीन्यपूर्ण सांघिक स्पर्धा, 24 संघांचा सहभाग
वृत्तसंस्था/ सिडनी
एटीपी चषक ही पुरुष टेनिसमधील नावीन्यपूर्ण सांघिक चॅम्पियनशिप असून शुक्रवारी 3 जानेवारीपासून त्याची सुरुवात होणार आहे. त्यात राफेल नदाल, नोव्हॅक जोकोविचसह अनेकजण मोसमाची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.
पहिल्या एटीपी चषक स्पर्धेत 24 संघांचा सहभाग राहणार असून त्यांची सहा गटात विभागणी करण्यात आली आहे. यातील सामने ऑस्ट्रेलियातील तीन विविध शहरात खेळविण्यात येणार आहेत. राऊंडरॉबिन फेरीनंतर अव्वल आठ संघ बाद फेरीत खेळतील आणि यात जो संघ अजिंक्य राहील तोच या स्पर्धेचा विजेता असेल. टेनिसमधील ही नवी स्पर्धा असून ती पुरुष टेनिसपटूंसाठी असलेली तिसरी सांघिक स्पर्धा आहे. नवा बदल करण्यात आलेली डेव्हिस चषक आणि रॉड लेव्हर चषक या दोन स्पर्धा आधीपासून खेळविल्या जात आहेत. लेव्हर चषकांमध्ये युरोपियन विरुद्ध शेष विश्व खेळाडूंत लढती होतात.
मात्र काही नामवंत खेळाडूंनी माघार घेतल्याने एटीपी चषक स्पर्धेचे वलय थोडेसे कमी झाले आहे. रॉजर फेडररने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला तर जपानचा केई निशिकोरी व ब्रिटनचा अँडी मरे यांनी दुखापतीमुळे त्यातून माघार घेतली आहे. असे असले तरी जागतिक द्वितीय मानांकित जोकोविचने, सांघिक टेनिसच्या स्पर्धा वाढविण्याची चाल चांगली असल्याचे म्हटले आहे. टेनिस हा वैयक्तिक खेळासाठी ओळखला जातो. पण आता सांघिक स्पर्धेची भर पडतेय ही चांगली बाब असल्याचे तो म्हणतो. ‘90 टक्क्याहून अधिक वेळ आम्ही वैयक्तिक टेनिस स्पर्धाच खेळत असतो आणि सांघिक स्पर्धा कॅलेंडरमध्ये फारशा नाहीतच,’ असे तो म्हणाला. तो एटीपी प्लेअर कौन्सिलचा अध्यक्षही आहे. ‘या स्पर्धेमुळे अनेक देश एकत्र खेळताना दिसणार असून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची त्यात संधी मिळतेय, ही अभिमानाची बाब आहे. अशा प्रकारची सांघिक स्पर्धा निश्चितच प्रभाव पाडणारी असेल,’ असे तो म्हणाला.
या स्पर्धेची अंतिम लढत सिडनीत आयोजित केली जाणार असून काही गटसाखळी लढतीही येथे खेळविण्यात येणार आहेत. अन्य लढती ब्रिस्बेन व पर्थ येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 15 दशलक्ष डॉलर्स बक्षीस ठेवण्यात आले असून एकेरीसाठी 750 व दुहेरीसाठी 250 एटीपी मानांकन गुणही खेळाडूंना मिळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार निक किर्गीओसने जोकोविचच्या मताशी सहमती दर्शवित ही स्पर्धा जबरदस्त प्रभाव पाडणारी असेल, असे म्हटले आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध राष्ट्रीय संघातून खेळण्याची संधी मिळणे, याहून दुसरी चांगली गोष्ट नसल्याचे तो म्हणतो. या स्पर्धेत फेडरर, निशिकोरी, अँडी मरे खेळणार नसले तरी जगातील 30 अव्वल टेनिसपटू खेळताना दिसणार आहेत.
प्रत्येक दिवशी दोन लढती
3 ते 12 जानेवारीपर्यंत होणाऱया या स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी तिन्ही ठिकाणी राऊंडरॉबिन फेरीतील दोन लढती खेळविल्या जातील. त्यात दोन एकेरीचे व एक दुहेरीचा सामना होईल. सिडनीमध्ये बेल्जियम व मॉल्डोव्हा यांच्या लढतीने सुरुवात होईल तर ब्रिटन व बल्गेरिया यांच्यात दुसरी लढत होईल. ब्रिस्बेनमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया व जर्मनी आणि ग्रीस व कॅनडा यांच्या तर पर्थमध्ये अमेरिका व नॉर्वे आणि रशिया व इटली यांच्या लढती होणार आहेत. दुसऱया दिवशी ब्रिस्बेनमध्ये जोकोविचच्या सर्बियाची व पर्थमध्ये नदालच्या स्पेन लढत होईल.
प्रत्येक देशाच्या दुसऱया क्रमांकाच्या खेळाडूंत एकेरीचा पहिला सामना होईल, त्यानंतर अव्वल खेळाडूंत दुसरा एकेरी सामना होईल. दुहेरीचा सामना शेवटी होईल, त्याला कदाचित निर्णायक स्वरूपाची असू शकते. दोन सामने जिंकणारा संघ लढतीत विजयी ठरेल. काही नामवंत माजी खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधार असून त्यात बोरिस बेकर (जर्मनी), मॅराट सॅफिन (रशिया), टिम हेन्मन (ब्रिटन), लेटॉन हेविट (ऑस्ट्रेलिया), थॉमस मस्टर (ऑस्ट्रिया) यांचा समावेश आहे. ‘नव्या मोसमाच्या सुरुवातीला सर्व टेनिसपटू विविध ठिकाणी खेळत राहिल्याने ते विखुरलेले दिसत असत. पण या एटीपी चषक स्पर्धेमुळे ते सर्व एकाच ठिकाणी खेळताना दिसणार आहेत. यामुळेच या स्पर्धेला सर्व टेनिसपटूंचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे,’ असे एटीपीचे मावळते चेअरमन ख्रिस केरमोड म्हणाले.
एटीपी चषक स्पर्धेची गटवारी
गट अ (ब्रिस्बेन) : सर्बिया, फ्रान्स, द.आफ्रिका, चिली.
गट ब (पर्थ) : स्पेन, जपान, जॉर्जिया, उरुग्वे.
गट क (सिडनी) : बल्गेरिया, बेल्जियम, ग्रेट ब्रिटन, मॉल्डोव्हा.
गट ड (पर्थ) : रशिया, इटली, अमेरिका, नॉर्वे.
गट ई (सिडनी) : ऑस्ट्रिया, क्रोएशिया, अर्जेन्टिना, पोलंड.
गट फ (ब्रिस्बेन) : जर्मनी, ग्रीस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.