वृत्तसंस्था/ रावळपिंडी
यजमान पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे सुरू असलेली पहिली क्रिकेट कसोटी अनिर्णित अवस्थेकडे झुकली आहे. सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पावसाचा अडथळा आला होता. अंधुक प्रकाशामुळे खेळविण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 7 बाद 449 धावा जमविल्या. तत्पूर्वी पाकने आपला पहिला डाव 4 बाद 476 धावांवर घोषित केला होता. ऑस्ट्रेलियातर्फे लाबुशाने, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी शानदार अर्धशतके झळकविली.
ऑस्ट्रेलियाने 2 बाद 271 या धावसंख्येवरून सोमवारी खेळाला पुढे सुरूवात केली आणि लाबुशाने व स्टीव्ह स्मिथ या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 108 धावांची भागिदारी केली. लाबुशानेने 158 चेंडूत 12 चौकारांसह 90 धावा जमविल्या तर स्टीव्ह स्मिथने 196 चेंडूत आठ चौकारांसह 78 धावांचे योगदान दिले. उस्मान ख्वाजा आणि लाबुशाने हे दोन फलंदाज नव्वदीत बाद झाले. हेडने दोन चौकारांसह 8 धावा जमविल्या. कॅमेरून ग्रीन आणि स्मिथ यांनी पाचव्या गडय़ासाठी 81 धावांची भर घातली. ग्रीनने 109 चेंडूत 4 चौकारांसह 48 धावा जमविल्या तर कॅरेने 3 चौकारांसह 19 धावा केल्या. चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 137 षटकांत 7 बाद 449 धावा जमविल्या. स्टार्क 12 तर कर्णधार कमिन्स 4 धावांवर खेळत आहेत. या सामन्यात सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी संपूर्ण मैदान ओलसर असल्याने उपाहारापर्यंतचा खेळ होवू शकला नाही. रविवारी रात्री येथे मुसळधार पाऊस झाला होता. सोमवारी चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 4 बाद 364 धावापर्यंत मजल मारली होती. चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने 112 धावा जमविताना 3 फलंदाज गमविले. तब्बल 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच पाकमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अद्याप 27 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 3 गडी खेळावयाचे आहेत. पाकतर्फे नौमन अलीने 107 धावांत 4 गडी तर साजीद खान, नसीम शहा आणि शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पाक प.डाव 162 षटकांत 4 बाद 476 डाव घोषित, ऑस्ट्रेलिया प. डाव 137 षटकांत 7 बाद 449 (उस्मान ख्वाजा 97, वॉर्नर 68, लाबुशाने 90, स्टीव्ह स्मिथ 78, हेड 8, ग्रीन 48, कॅरे 19, स्टार्क खेळत आहे 12, कमिन्स खेळत आहे 4, नौमन अली 4-107, साजीद खान 1-122, नसीम शहा 1-89, शाहीन आफ्रिदी 1-80).