एकतर्फी फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला, हार्दिक पंडय़ाचे 17 धावात 3 बळी -34 धावा
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
1 लाख 4 हजार 859 प्रेक्षकांच्या साक्षीने हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा एकतर्फी धुव्वा उडवला आणि पहिल्याच दणक्यात आयपीएलच्या झळाळत्या चषकावर अगदी थाटात आपले नाव कोरले! या देदीप्यमान विजयासह गुजरातने स्वप्नवत हंगामाची विजयाने सांगता केली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंडय़ाचा अष्टपैलू खेळ या लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले. प्रारंभी, प्रथम फलंदाजी करणाऱया राजस्थानला 20 षटकात 9 बाद 130 धावांवर रोखल्यानंतर गुजरातने 18.1 षटकात 3 बाद 133 धावांसह सहज धूळ चारली.
131 धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना गुजराततर्फे शुभमन गिल (नाबाद 45), हार्दिक पंडय़ा (34), डेव्हिड मिलर (19 चेंडूत नाबाद 32) यांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला. राजस्थानने गुजरातचे पहिले दोन गडी सहज बाद करत सामन्यात रंग भरण्याचा प्रयत्न जरुर केला. पण, अखेर ते निव्वळ पेल्यातील वादळ ठरले.
विजयासाठी 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलला खाते उघडण्यापूर्वीच हवेहवेसे जीवदान मिळाले. तरी, सहकारी सलामीवीर वृद्धिमान साहा (5) व तिसऱया स्थानावरील मॅथ्यू वेड (8) स्वस्तात बाद झाल्याने गुजरातला या लो स्कोअरिंग लढतीत लागोपाठ धक्के सोसावे लागले. प्रसिद्ध कृष्णाने बॅट-पॅडमधून गॅप काढणाऱया लेंग्थ बॉलवर साहाचा त्रिफळा उडवला तर बोल्टच्या फुल्लर लेंग्थ चेंडूवर मॅथ्यू वेडचा फ्लिकचा प्रयत्न फसला. रियान परागने झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. यामुळे गुजरातची 2 बाद 23 अशी स्थिती होती.
लागोपाठ धक्के पचवावे लागल्यानंतर हार्दिक पंडय़ा व गिल यांना सावध पवित्र्यावर भर देणे भाग होते आणि याचा विपरीत परिणाम त्यांच्या धावगतीवर झाला. पण, यानंतरही या उभयतांनी प्रसंगी एकेरी-दुहेरी धावा घेण्यावर भर देत विजयाकडे जोरदार आगेकूच केली. पंडय़ाची खेळी संपुष्टात आली तरी गिलने डेव्हिड मिलरसह विजय संपादन करुन दिला.
प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकला?
प्रारंभी, गुजरातने राजस्थानला 20 षटकात 9 बाद 130 धावांवर रोखण्यात यश प्राप्त केले. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय त्यांच्यावरच उलटल्याचे यावेळी अधोरेखित झाले. हार्दिक पंडय़ाने 4 षटकांचा कोटा पूर्ण करत अवघ्या 17 धावात 3 बळी घेतले. राजस्थानतर्फे जोस बटलरने सर्वाधिक 39 तर यशस्वी जैस्वालने 16 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. त्यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले.
राजस्थान रॉयल्सला या निर्णायक सामन्यातील 6 षटकांच्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 44 धावांपर्यंत मजल मारता आली. यादरम्यान सलामीवीर यशस्वी जैस्वाल 22 धावांवर बाद झाला. पहिल्या 2 षटकात तर गुजरातने केवळ सातच धावा दिल्या. मोहम्मद शमीच्या तिसऱया षटकात 14 धावा वसूल करत राजस्थानने फटकेबाजीला सुरुवात केली. यश दयालने चौथ्या षटकात जैस्वालला बाद केले. लॉकी फर्ग्युसन व रशिद खान यांनी पाचव्या व सहाव्या षटकात काटेकोर मारा केला.
मधल्या षटकांच्या खेळात बटलरने फर्ग्युसनला लागोपाठ चौकार फटकावत आक्रमणाला सुरुवात केली. पण, टाईमआऊटनंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंडय़ाने धोकादायक संजू सॅमसनला (14) बाद केले. बटलरने शमीला 10 व्या षटकात शमीला आणखी 2 चौकार फटकावले. पण, रशिदने देवदत्त पडिक्कलला बाद केल्यानंतर पंडय़ाला बटलरसारखा धोकादायक फलंदाज माघारी धाडण्यात यश मिळाले आणि यामुळे गुजरातचा वरचष्मा अधोरेखित झाला.
गुजरातच्या गोलंदाजांनी काटेकोर मारा करत राजस्थानच्या गोलंदाजांना फारशी मोकळीक दिली नाही. विशेषतः हार्दिक पंडय़ाची शिस्तबद्ध गोलंदाजी लक्षवेधी होती. त्याने विशेषतः पडिक्कलला सातत्याने पेचात टाकले. अपेक्षित धावा होत नसल्याने बटलरवरही दडपण वाढत गेले आणि हेच दडपण झुगारुन टाकण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गुजरातला बहाल केली. रशिद खानने 18 धावात 1 बळी, असे पृथक्करण नोंदवले.
गुजरातने शेवटच्या टप्प्यात डेथ ओव्हर्समध्येही आपले नियंत्रण कायम राखले. 16 व्या षटकात तर रविचंद्रन अश्विनला बाद करणाऱया आर. साई किशोरने केवळ 4 धावा दिल्या. फर्ग्युसन, किशोर यांनी वर्चस्व कायम राखले. यामुळे राजस्थानला अपेक्षित धावांचा डोंगर रचण्यापासून दूरच रहावे लागले.
शून्यावर जीवदान मिळालेल्या शुभमन गिलनेच खेचला विजयी षटकार!
चहल व हेतमेयरकडून मिळालेल्या 2 जीवदानांचा पुरेपूर लाभ घेत शुभमन गिलने गुजरातच्या या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने 43 चेंडूत नाबाद 45 धावांचे योगदान दिले. या निर्णायक लढतीत पहिल्याच चेंडूवर चहलने जीवदान दिले, त्यावेळी गिलने खातेही उघडले नव्हते. नंतर एक्स्ट्रा कव्हरवर हेतमेयरला मागे धावत जाऊन कठीण झेल टिपता आला नाही, त्यावेळी गिल 13 धावांवर होता. गिलने या जीवदानांचा लाभ तर घेतलाच. शिवाय, 19 व्या षटकात मकॉयचा पहिलाच चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने उत्तुंग षटकारासाठी फटकावत विजय मिळवून देत त्याने राजस्थानच्या जखमेवर आणखी मीठ चोळले!
ज्या गोलंदाजीमुळे बाहेर गेला, त्याच गोलंदाजीमुळे पंडय़ा स्टार ठरला!
काही कालावधीपूर्वी पाठीवर शस्त्रक्रिया करवून घेतल्यानंतर हार्दिक पंडय़ा गोलंदाजी करु शकत नव्हता आणि फक्त फलंदाज या नात्याने खेळवता येणार नाही, अशी भूमिका घेत त्याला राष्ट्रीय प्रवाहातून बाहेर ठेवले गेले होते. या सर्वाचा त्याच्या खेळावर विपरित परिणामही दिसून आला. पण, यंदा आयपीएलच्या व्यासपीठावर गोलंदाजीत चमक दाखवणाऱया याच पंडय़ाने निर्धाराने भेदक मारा साकारत 4 षटकात 17 धावात 3 बळी घेतले आणि टीकाकारांना जणू चोख प्रत्युत्तर दिले.
अन् संतप्त बटलरने सीमारेषेजवळ हेल्मेट, ग्लोव्ह्ज भिरकावले!
सूर सापडत नसला तरी डावातील 13 व्या षटकापर्यंत क्रीझवर टिकून राहू शकलेल्या बटलरची एकाग्रता अखेर पंडय़ाच्या गोलंदाजीवर भंगली. किंचीत बाहेर जाणारा चेंडू थर्डमॅनकडे फटकावण्याचा त्याचा प्रयत्न सपशेल फसला आणि यष्टीमागे साहाने सोपा झेल टिपत महत्त्वाचा अडसर दूर केला. या हंगामात धडाकेबाज फलंदाजीसह 800 धावांचा टप्पा सर करणाऱया बटलरला या निर्णायक सामन्यातील अपयश पचवता आले नाही आणि त्याने सीमारेषेजवळ येताच हेल्मेट व ग्लोव्ह्ज फेकून देत आपला संताप व्यक्त केला.
फ्लाईंग स्टार्ट देण्यापूर्वीच यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद!
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने सलग दुसऱयांदा नाणेफेक जिंकली. मात्र, त्याचा प्रथम फलंदाजीचा निर्णय आश्चर्याचा ठरला. येथील मैदानावर मागील लढतही खेळवली गेली असल्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. मात्र, यानंतरही राजस्थानला अपेक्षित फ्लाईंग स्टार्ट मिळाला नाही. डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालने 16 चेंडूत 22 धावा फटकावल्या असल्या तरी याचे तो मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकला नाही. डावखुऱया दयालच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने डीप स्क्वेअर लेगवरील साई किशोरकडे झेल दिला.
सर्वात भव्य क्रिकेट जर्सीसह आयपीएल गिनीज रेकॉर्ड बुकमध्ये!
गुजरात टायटन्स-राजस्थान रॉयल्स यांच्यातील हाय व्होल्टेज फायनलपूर्वी आयपीएलने जागतिक स्तरावरील सर्वात मोठय़ा क्रिकेट जर्सीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. 15 व्या आवृत्तीतील आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने हा उपक्रम साकारला गेला. आयपीएलला 15 वर्षे पूर्ण होत असल्याने 66ƒ42 मीटर्सच्या या जर्सीला 15 हा क्रमांक देण्यात आला.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सतर्फे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली, सचिव जय शाह, आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्याकडे रेकॉर्डचे सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. सदर जर्सीवर आयपीएलमधील सहभागी सर्व 10 संघांचा लोगो समाविष्ट आहे.
गुजरातचा संघही अडचणीत होता, पण…
विजयासाठी 131 धावांचे तुलनेने माफक आव्हान असताना 4.3 षटकात 2 बाद 23 अशी दाणादाण उडाली होती. ही लो स्कोअरिंग लढत रोमांचक होऊ शकेल, असेच त्यावेळी संकेत होते. पण, शुभमन गिल, हार्दिक पंडय़ा व डेव्हिड मिलरच्या समयोचित फलंदाजीमुळे गुजरातला विजयाच्या ट्रकवर येण्यात यश मिळाले. गिल व मिलर यांनी 29 चेंडूत 47 धावांची अभेद्य भागीदारी साकारत विजय संपादन करुन दिला.
सांगता सोहळय़ाला लाभला बॉलिवूडचा तडका!
फायनल लढतीत दोन्ही संघांमध्ये लढतीला प्रारंभ होण्यापूर्वी आयोजित भव्यदिव्य सांगता सोहळय़ाला बॉलिवूडचा तडका लाभला आणि एआर रेहमान, रणवीर सिंगच्या साथीने उत्साही प्रेक्षकांनी अक्षरशः सारे स्टेडियम डोक्यावर घेतले!
नरेंद्र मोदी स्टेडियमवर एआर रेहमान, रणवीर या सांगता सोहळय़ाचे मुख्य आकर्षण केंद्र ठरले. त्यांना मोहित चौहान, नीती मोहन, शिवमणी, साशा त्रिपाठी, श्वेता मोहन यांची साथ होती.
एआर रेहमानने मोजक्या म्युझिसियन्ससह भारतीय क्रिकेटच्या 8 दशकांचा प्रवास म्युझिक शोच्या माध्यमातून सादर केला. प्रारंभी वंदे मातरमने जोरदार सुरुवात केल्यानंतर उपस्थित चाहत्यांनीही त्यावर ठेका धरला. 15 मिनिटांच्या आपल्या एनर्जी शोमध्ये रणवीर सिंगनेही सांगता सोहळय़ात आणखी रंग भरले. त्याने 83 चित्रपटातील जीतेगा, जीतेगा या गाण्यावर परफॉर्मन्स दिला आणि नंतर आरआरआरमधील केजीएफचा आयकॉनिक डायलॉग, गीत सादर केल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला आणखी उधाण आले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स ः 20 षटकात 9 बाद 130 (जोस बटलर 35 चेंडूत 5 चौकारांसह 39, यशस्वी जैस्वाल 16 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह 22, संजू सॅमसन 11 चेंडूत 14, रियान पराग 15, ट्रेंट बोल्ट 7 चेंडूत 1 षटकारासह 11, हेतमेयर 12 चेंडूत 2 चौकारांसह 11. अवांतर 2. हार्दिक पंडय़ा 4 षटकात 17 धावात 3 बळी, रविश्रीनिवासन साई किशोर 2-20, शमी, यश दयाल, रशिद खान प्रत्येकी 1 बळी).
गुजरात टायटन्स ः 18.1 षटकात 3 बाद 133 (शुभमन गिल 43 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारांसह नाबाद 45, हार्दिक पंडय़ा 30 चेंडूत 34, डेव्हिड मिलर 19 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह नाबाद 32. अवांतर 9. बोल्ट 1-14, चहल 1-20, प्रसिद्ध कृष्णा 1-40).