निफ्टी किंचीत घसरणीसह सेन्सेक्स 86 अंकांनी घसरलाः सन फार्मा नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 86 अंकांच्या घसरणीसह आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचा निर्देशांक 7 अंकांच्या किंचीत घसरणीसह बंद झाला. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांचा, विदेशातील बाजारामध्ये असणारी अस्थिरता यांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसला.
सोमवारी सेन्सेक्सचा निर्देशांक 49,771.29 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 14,736.40 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 समभागांमध्ये तेजी होती. यात इंडसइंड बँकेचा समभाग सर्वाधिक 4 टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळाले तर दुसरीकडे टेक महिंद्रा व सन फार्मा यांचे समभाग 2 टक्क्यांनी तेजी दर्शवून बंद झाले. टीसीएस, इन्फोसिस यांचेही समभाग 2 टक्के वाढ दर्शवत होते. सेन्सेक्स निर्देशांकाने वरपर्यंत मजल मारताना 49,878 अंकांचा स्तर गाठला होता तर 49,281 अंकांचा नीचांकी स्तरही दिवसभराच्या व्यवहारात गाठल्याचे दिसून आले. अदानी ग्रीनच्या समभागाने 5 टक्के वाढीसह विक्रमी भावावर बंद होण्याची किमया साधली. जागतिक दबावाच्या संकेतामुळे स्थानिक शेअरबाजार सोमवारी कमकुवत दिसून आला. अगदी सुरूवातीपासूनच सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक दोन्हीही घसरण नोंदवत होते. सेन्सेक्स 250 अंकांनी तर निफ्टी निर्देशांकही 14,700 च्या खाली पोहोचला होता. सेन्सेक्सचा निर्देशांक 49,595 अंकांवर सकाळी व्यवहार करत होता. आज फार्मा क्षेत्रातील समभागांनी बाजाराला चांगला आधार दिल्याचे दिसले. बँक व वित्तीय क्षेत्रातील समभागांची विक्री होताना दिसली. डॉ. रेड्डीज नफ्यात तर आरआयएल मात्र तोटय़ात होती. सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज व पॉवर ग्रिडचे समभाग 2-2 टक्के इतके घसरणीत होते.
बीएसईवर 2908 समभागांमध्ये 1492 समभाग तेजी तर 1220 समभाग घसरणीत होते. लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 203.40 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे 19 मार्च रोजी 203.44 लाख कोटी रुपये होते.
जपान, हाँगकाँग बाजारही घसरणीत
जपानचा निक्केई 572 अंकांनी घटीसह 29,220 वर तर हाँगकाँगचा हँगसेंग 81 अंकांच्या घसरणीसह 28,909 वर व्यवहार करत होता. दुसरीकडे चीनमधील शांघाई कम्पोझिट व कोरियाचा कोस्पी निर्देशांक हलक्मया तेजीसह व्यवहार करत होते. ऑस्ट्रेलियातील बाजारही तेजीत होता. रोखे उत्पन्न व महागाईमुळे अमेरिकेतील बाजारांवर दबाव दिसला आहे. गेल्या काही दिवसात मोठय़ा प्रमाणात बाजारात चढउतार दिसून आला आहे.