सेन्सेक्स 380 तर निफ्टी 123 अंकांच्या वाढीसह बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिकेत कोरोनाच्या महामारीला समर्थपणे उत्तर देण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज जाहीर केल्याने शेअर बाजाराने सलग चौथ्या दिवशी निर्देशांकाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. सेन्सेक्स 380 अंकांच्या वाढीसह आणि निफ्टी 123 अंकांच्या वाढीसह बंद झाला.
सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी तेजीचा सूर कायम ठेवत नव्या विक्रमाकडे घोडदौड सुरु ठेवली आहे. सेन्सेक्सने 47 हजाराचा टप्पा ओलांडत 47,354.71 पर्यंत मजल मारली आहे. ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. दुसरीकडे निफ्टीनेही 13,800 अंकांवर दिवसाची सुरुवात करत 13,865.45 वर झेप घेतली होती. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना संबंधित पॅकेजवर सह्या केल्याची बातमी आशियाई शेअर बाजाराला सुखावून गेली. याचे पडसाद भारतीय शेअर बाजारावरही सकारात्मक दिसून आले. सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 363 अंकांच्या तेजीसह 47,336.91 आणि निफ्टी 101 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 13,851.05 अंकांवर खुला झाला होता.
निफ्टी सलग चौथ्या दिवशी 0.9 टक्के वाढीसह म्हणजे 380 अंकांच्या वाढीसह 13,873.20 वर बंद झाला तर दिवसाच्या सरतेशेवटी सेन्सेक्स 0.81 वाढीसह 47,353.75 वर स्थिरावला. डिसेंबरमध्ये आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी 7 टक्क्यांची तेजी दर्शविली आहे. सध्याची सेन्सेक्स व निफ्टीतील उसळी पाहता गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका बाळगायला हवी, असे तज्ञांचे म्हणणे आहे. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांनी निफ्टीच्या मजबुतीत मोठा हातभार लावला होता. रिलायन्स इंडस्ट्रिज लि. चे समभाग सलग तिसऱया सत्रात 0.43 टक्क्यांनी वधारल्याचे दिसले. आजच्या सत्रामध्ये टायटन, एसबीआय, लार्सन आणि टुब्रो, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंट्स यांचे समभाग तेजीसह बंद झाले.