प्रतिनिधी / सातारा :
3 जानेवारीपासून भारतात 15 ते 18 वयोगटामधील विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय शासनाकडून आला. त्यानंतर सातारा शहरातील शाहुनगर येथील गुरूकुल स्कूलच्या 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी 100 टक्के लसीकरण करण्यात आले. पहिल्याच दिवशी 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारी गुरूकुल ही भारतातील पहिली शाळा ठरली असून, शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालक यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी डॉ. चव्हाण म्हणाले , कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्हीही लस सुरक्षित असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांच्या आरोग्यास प्राधान्य देणे ही आपली नैतिक जबाबदारी समजून लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी शाळेमधील 15 ते 18 वय पुर्ण केलेल्या 166 विद्यार्थ्यांचे आज लसीकरण पुर्ण करण्यात आले, याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
गुरूकुल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यावेळी म्हणाले, केंद्रशासन व राज्य शासनाने विद्यार्थ्यांसाठी राबविलेला लसीचा उपक्रम स्तुत्य असून सदर वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांनी लसवंत व्हावे व यासाठी सदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी जागरूक राहुन वेळीच स्वतःच्या पाल्याला लस दयावी. गुरूकुलच्या पालकांनी लसीकरणासाठी संमती दिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानत पहिल्याच दिवशी 100 टक्के लसीकरण करणारी गुरूकुल भारतातील पहिली शाळा असून, इतिहासात याची नक्कीच नोंद घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणिस दीपक प्रभावळकर, मुख्याध्यापिका शिला वेल्हाळ, उपमुख्याध्यापिका अनुराधा कदम, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे , माध्यमिक विभागप्रमुख सोनाली तांबोळी आदी उपस्थित होते.