बेळगाव / प्रतिनिधी
मागील तीन महिन्यांपासून बंद असलेल्या नाशिक शहरासाठीची प्रवासी विमानसेवा पूर्ववत झाली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी 42 प्रवाशांनी बेळगाव-नाशिक असा विमानप्रवास केला. नाशिक शहराला विमानसेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
स्टार एअरने 25 जानेवारीपासून बेळगाव-नाशिक ही प्रवासी विमानसेवा सुरू केली होती. पश्चिम महाराष्ट्र, गोवा व उत्तर कर्नाटकातून पहिल्यांदाच नाशिक शहराला बेळगावमधून विमान सुरू झाल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने प्रवाशांची संख्या कमी होत गेली. यामुळे ही सेवा एप्रिलपासून थांबविण्यात आली होती.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या आटोक्मयात आली असून बेळगावमध्येही लॉकडाऊन खुले करण्यात आल्याने पुन्हा एकदा सेवा सुरू करण्याचा निर्णय स्टार एअरने घेतला आहे. शुक्रवार दि. 2 जुलैपासून या विमानफेरीला पुन्हा सुरुवात करण्यात आली. सोमवार, शुक्रवार व रविवार असे 3 दिवस ही सेवा उपलब्ध असणार आहे.
शुक्रवारी दुपारी 4.39 वा. बेळगावमधून निघालेले विमान सायंकाळी 5.50 वा. नाशिकच्या ओझर विमानतळावर उतरले. 50 आसन क्षमता असणारे स्टारचे विमान नाशिकला जाताना 25 प्रवासी घेऊन गेले. तासाभरानंतर हे विमान 17 प्रवाशांना घेऊन पुन्हा बेळगावला आले.