वृत्तसंस्था/ मियामी
अमेरिकेची अनुभवी टेनिसपटू व्हीनस विल्यम्स येथे सुरू झालेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाली. कझाकच्या झरिना दियासने तिचे आव्हान सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले.
झरिनाने व्हीनसवर 6-2, 7-6 (12-10) अशी सुमारे दीड तासाच्या लढतीत मात करीत दुसरी फेरी गाठली. 1997 पासून व्हीनस या स्पर्धेत खेळत असून पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. झरिनाची दुसऱया फेरीची लढत स्वित्झर्लंडच्या बेलिन्डा बेन्सिकशी होणार आहे. झरिनाने पहिला सेट सहज जिंकला. पण दुसऱया सेटमध्ये व्हीनसने कडवी झुंज देत टायब्रेकरमध्ये तीनदा मॅचपॉईंट्स वाचविले. व्हीनसने डबल फॉल्ट करीत झरिनाला चौथा मॅचपॉईंट बहाल केला. त्याचा लाभ घेत झरिनाने विजय साकार केला.