स्थायी समिती सभेत निर्णय ः निपाणीकर कॉलनीतील रस्त्यांसाठी तरतूद
प्रतिनिधी/सांगली
मिरजेतील प्रभाग क्रमांक तीनमधील निपाणीकर कॉलनीतील अंतर्गत रस्ते डांबरीकरणासाठी 64 लाख 21 हजारांच्या खर्चास स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली. पहिल्याच सभेत सभापती निरंजन आवटी यांनी मिरजेवर कृपा केली. त्यामुळे तिन्ही शहरांचा समतोल विकासाचा दावा यापुढच्या काळात फोल ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानांतर्गत शासनाकडून महापालिकेस प्राप्त शिल्लक रकमेतून हे काम होणार आहे. महापालिका स्थायी समितीची सभा सभापती निरंजन आवटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नवनिर्वाचित सभापती आवटी यांची ही पहिलीच सभा होती. सभेच्या अजेंडÎावर मिरजेतील प्रभाग क्रमांक तीन मधील 64 लाखांच्या रस्ते डांबरीकरणाच्या खर्चास मान्यता देणे व निविदा मागविण्याचा विषय होता. आवटी हे मिरजेचे आहेत. त्यामुळे मिरजेतील रस्त्यांचा विषय पहिल्याच सभेत आला. त्यामुळे आवटी यांनी सुरूवात मिरजेतून केल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, कुपवाड, सांगली मधीलही काही रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सांगली शहरातील जुना बुधगाव रोड, शंभर फूटी रस्त्यांवर खड्डंयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिक, वाहनधारकांना प्रवास करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुपवाडमधील रस्त्यांची अवस्थाही नाजूक आहे. वास्तविक या दोन शहरातील रस्त्यांकडेही लक्ष देणे गरजेचे असताना केवळ मिरजेतील रस्त्यांसाठीचा विषय सभेत अजेंडÎावर घेण्यात आला. तिन्ही शहरांचा समतोल विकास करू, अशी ग्वाही सभापती आवटी यांनी निवडीनंतर दिली होती. मात्र, काही दिवसांतच याला तडा गेला आहे.
कुपवाड ड्रेनेज योजना, घनकचरा प्रकल्प
कुपवाड ड्रेनेज योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत हे मोठे प्रकल्प प्रलंबित आहेत. ते या वर्षात मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. महापालिका क्षेत्रात काँक्रीट रोड करण्यावर भर देणार आहे. महापालिका क्षेत्रात रस्ते, वीज, पाणी, गटार, ड्रेनेज ही कामे करण्याबरोबरच सायन्स पार्क, संग्रहालय तसेच मुलांसाठी अटल सायन्स लॅब प्रमाणे महापालिका शाळांमध्ये सायन्स लॅब सुरू करण्याचा मनोदय सभापती आवटी यांनी व्यक्त केला.