दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबीवर 6 गडी राखून एकतर्फी विजय, पराभवानंतरही आरसीबी प्ले-ऑफमध्ये
वृत्तसंस्था/ अबु धाबी
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचा 6 गडी राखून धुव्वा उडवला आणि या हंगामातील दुसरे स्थान निश्चित केले. या निकालामुळे स्पर्धेच्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमनेसामने भिडतील, हे स्पष्ट झाले. दिल्लीचा संघ सलग दुसऱयांदा प्ले-ऑफमध्ये पोहोचला तर दुसरीकडे, आरसीबीचा संघ येथे पराभूत झाल्यानंतरही प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला.
दिल्लीने विजयासाठी 153 धावांचे आव्हान पार करण्यासाठी 17.3 पेक्षा अधिक षटके खेळल्याने आरसीबीचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित झाले. आता उर्वरित चौथ्या स्थानी केकेआर विराजमान होणार की सनरायजर्स हैदराबाद, हे आज होणाऱया मुंबई-हैदराबाद लढतीवरुन स्पष्ट होईल.
सोमवारी झालेल्या लढतीत आरसीबीने 7 बाद 152 अशी किरकोळ धावसंख्या रचली तर प्रत्युत्तरात दिल्लीने 19 षटकात 4 बाद 154 धावांसह 2 गुण वसूल केले. दिल्लीतर्फे शिखर धवनने 41 चेंडूत 54 तर अजिंक्य रहाणेने 46 चेंडूत 60 धावांची बहारदार खेळी साकारली. आज या स्पर्धेतील शेवटची साखळी लढत होईल. त्यात सनरायजर्स जिंकले तर ते प्ले-ऑफमध्ये पोहोचतील व ते हरले तर केकेआरला संधी मिळेल.
कॅगिसो रबाडाचा (30 धावात 2 बळी) भेदक मारा आणि त्याला पूरक ठरलेल्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे दिल्लीविरुद्धच्या आयपीएल साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला 20 षटकात 7 बाद 152 धावांवर समाधान मानावे लागले. आरसीबीतर्फे देवदत्त पडिक्कलने (41 चेंडूत 50) शानदार अर्धशतक झळकावले तर डीव्हिलियर्सने 21 चेंडूत 35 धावा केल्या. अन्य फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली आणि यामुळे आरसीबीच्या धावसंख्येवर मर्यादा राहिल्या.
सलामीवीर जोश फिलीपने 17 चेंडूत 12 धावा केल्या आणि रबाडाच्या गोलंदाजीवर शॉकडे झेल देत तो तंबूत परतला. आरसीबीच्या डावातील बाद होणारा तो पहिला फलंदाज ठरला.
त्यानंतर देवदत्त व कर्णधार विराट कोहली (24 चेंडूत 29) यांनी दुसऱया गडय़ासाठी 57 धावांची भागीदारी साकारली होती.
डावातील 13 व्या षटकात अश्विनने विराटला स्टोईनिसकरवी झेलबाद केले आणि ही जोडी फुटली. पडिक्कलने पुढे अव्वल फलंदाज एबी डीव्हिलियर्ससह 3.1 षटकात 40 धावांची आतषबाजी केली. डीव्हिलियर्सने 21 चेंडूत जलद 35 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 1 चौकार, 2 षटकारांचा समावेश राहिला.
पडिक्कल तिसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी आरसीबीने 15.4 षटकात 3 बाद 112 धावा केल्या होत्या. उर्वरित 4.2 षटकात त्यांना आणखी 40 धावांची भर घालता आली. ख्रिस मॉरिस (0), उदाना (4) स्वस्तात परतले तर शिवम दुबेने (11 चेंडूत 17) थोडीफार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला.
वॉशिंग्टन सुंदर 1 चेंडूत शून्यावर तर शाहबाज नदीम एका चेंडूत एका धावेवर नाबाद राहिला.
दिल्ली कॅपिटल्सतर्फे जलद गोलंदाज कॅगिसो रबाडाने 30 धावांच्या बदल्यात जोश फिलीप व शिवम दुबे यांचे बळी घेतले. याशिवाय, अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 18 धावात 1 बळी घेतला. डॅनिएल सॅम्स व नोर्त्जे महागडे ठरले. सॅम्सने 4 षटकात एकाही बळीशिवाय 40 तर नोर्त्जेने 4 षटकात एकही बळी न घेता 33 धावा दिल्या. अक्षर पटेलने 4 षटकात 30 धावा दिल्या आणि त्याचीही पाटी कोरीच राहिली.