मुख्यमंत्री बसवराज बोम्माई पुन्हा दिल्ली दौऱयावर – एक-दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप हायकमांडने हिरवा झेंडा दाखविल्याचे समजते. त्यानुसार बुधवारी पहिल्या टप्प्यात 20 जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी पुन्हा दिल्ली दौऱयावर गेले आहेत. सोमवारी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून मंत्र्यांची अंतिम यादी तयार करून ते परतणार असल्याचे समजते. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री बोम्माई यांनी, सोमवारी नड्डा यांची भेट घेणार असून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार आहे, असे सांगितले आहे.
यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पहिल्या टप्प्यातील चर्चा केली आहे. मंत्र्यांच्या यादीतील काही नावे बदलून नवी यादी घेऊन येण्याची सूचना हायकमांडने केल्याचे समजते. त्यानुसार बेंगळूरला परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी आणि रविवारी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. हायकमांडने सुचविल्यानुसार काही जणांची नावे बदलली असून नवी यादी तयार करून ते पुन्हा दिल्लीला गेले आहेत, असे समजते.
एकाच टप्प्यात पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास मोठय़ा प्रमाणात नाराजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 20 जणांचा बसवराज बोम्माई यांच्या मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. जर सर्व काही नियोजित कार्यक्रमानुसार झाल्यास बुधवारीच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या गटातील 10 आणि संघ परिवार व पक्षनिष्ठेतील 10 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱयावर असलेल्या मुख्यमंत्री बोम्माई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्य प्रभारी अरुण सिंग यांच्यासह अनेक नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे.
सध्याच्या मंत्रिमंडळात जेष्ठांना डच्चू देण्याची अधिक शक्यता आहे. के. एस. ईश्वरप्पा, व्ही. सोमण्णा, एस. सुरेशकुमार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याचे बहुतेक निश्चित झाल्याचे समजते. बेळगाव जिल्हय़ात रमेश जारकीहोळी यांच्या बदलात भालचंद्र जारकीहोळी, पंचमसाली समुदायातून मुरुगेश निराणी यांना तर उर्वरित एका जागेसाठी सी. सी. पाटील, बसनगौडा पाटील-यत्नाळ आणि अरविंद बेल्लद यांच्यात रस्सीखेच सुरू झाल्याचे समजते. यत्नाळ यांना येडियुराप्पा आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी तीव्र विरोध केल्याने अंतिमक्षणी ते बाहेर पडण्याची शक्यता आहे.
संभाव्य मंत्र्यांची यादी
भालचंद्र जारकीहोळी
उमेश कत्ती
मुरुगेश निराणी
गोविंद कारजोळ
जे. सी. मधुस्वामी
आर. अशोक
डॉ. के. सुधाकर
भैरती बसवराज
एस. टी. सोमशेखर
डॉ. सी. एन. अश्वथ नारायण,
श्रीरामुलू
राजूगौडा नायक
अरग ज्ञानेंद्र
एस. अंगार
एम. पी. रेणुकाचार्य
पुर्णिमा श्रीनिवास / तिप्पारेड्डी
सुनीलकुमार / हालाडी श्रीनिवास शेट्टी
अरविंद बेल्लद/बसनगौडा पाटील-यत्नाळ