गुजरात विधानसभा निवडणूक ः 89 जागांसाठी 788 उमेदवार मैदानात
@वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत एक डिसेंबर रोजी होणाऱया मतदानासाठीचा प्रचार मंगळवारी संपुष्टात आला आहे. दक्षिण गुजरातमधील 19 जिल्हे आणि कच्छ-सौराष्ट्र क्षेत्रामधील 89 जागांसाठी 788 उमेदवार मैदानात आहेत. या मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान होणार आहे. गुजरात निवडणुकीमध्ये यंदा त्रिकोणी लढत दिसून येणार आहे. भाजप अन् काँग्रेससह आम आदमी पक्षानेही स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत.
पहिल्या टप्प्यातील मुख्य उमेदवारांमध्ये ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार इसुदान गढवी यांचा समावेश असून ते द्वारका जिल्हय़ातील खंभालिया मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. माजी मंत्री पुरुषोत्तम सोलंकी, सहावेळचे आमदार कुंवरजी बावलिया, मोरबीचे ‘नायक’ कांतिलाल अमृतिया, क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबा आणि आप प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत.