रॉस टेलरची अर्धशतकी झुंज, स्टुअर्ट ब्रॉडचे 48 धावात 4 बळी
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
रॉस टेलरने 11 चौकारांसह 80 धावांची दमदार खेळी साकारल्यानंतर या बळावर न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध दुसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यातील आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 388 धावांची मजल गाठली व डावाअखेर 85 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. या लढतीत इंग्लंडचा पहिला डाव 305 धावांवर आटोपला होता. शनिवारी तिसऱया दिवशी चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी इंग्लंडची दुसऱया डावात 2 बाद 18 अशी खराब सुरुवात झाली होती.
पाहुण्या किवीज संघाने शनिवारी तिसऱया दिवशी 3 बाद 229 वरुन डावाला पुढे सुरुवात केली. त्यांच्या शेवटच्या 7 फलंदाजांनी 159 धावांची महत्त्वाची भर घातली. अनुभवी रॉस टेलरने 201 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत 139 चेंडूत 80 धावांचे योगदान दिले. त्याने निकोल्ससमवेत (56 चेंडूत 21) चौथ्या गडय़ासाठी 63 धावांची भागीदारी केली.
त्यानंतर टॉम ब्लंडेलने 77 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. तळाच्या क्रमवारीत अजाझ पटेल (33 चेंडूत 20), मॅट हेन्री (12), ट्रेंट बोल्ट (नाबाद 12) यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. इंग्लिश संघातर्फे जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने 23.1 षटकात 48 धावात 4 फलंदाज बाद केले. याशिवाय, मार्क वूड (2-85), ओलि स्टोन (2-92) यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. जेम्स अँडरसन व डॅन लॉरेन्स यांना प्रत्येकी 1 बळी घेता आला.
चहापानासाठी खेळ थांबवला जाण्यापूर्वी इंग्लंडची पडझड मात्र धक्कादायक ठरली. त्यांना 6 षटकात 18 धावांसाठी दोन्ही सलामीवीर गमवावे लागले. जलद गोलंदाज मॅट हेन्रीने दोन्ही सलामीवीरांना बाद केले. रोरी बर्न्स खातेही न उघडता लॅथमकडे तर डॉम सिबली मिशेलकडे झेल देत बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 303. न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद 388 (कॉनव्हे 80, विल यंग 82, रॉस टेलर 80. ब्रॉड 4-48) इंग्लंड दुसरा डाव ः 2-18 (मॅट हेन्री 7 धावात 2 बळी).