भारताच्या 327 धावांना प्रत्युत्तर देताना द. आफ्रिकेचा डाव 197 धावात खुर्दा, शमीचे 5 बळी, बुमराह-शार्दुलला दुहेरी यश
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवशी भारताने पहिल्या डावाअखेर 130 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. या कसोटी सामन्यात भारताने 3 बाद 272 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर 55 धावातच 7 गडी गमावले आणि यामुळे सर्वबाद 327 धावांवर समाधान मानावे लागले. मात्र, प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 62.3 षटकात अवघ्या 197 धावांमध्येच खुर्दा झाला. भारतातर्फे मोहम्मद शमीने तेजतर्रार तिखट मारा साकारत 44 धावात 5 बळी घेतले. दिवसअखेर भारताने दुसऱया डावात 1 बाद 16 धावा केल्या असून संघाची एकत्रित आघाडी 146 वर पोहोचली आहे.
दक्षिण आफ्रिकेला 197 धावांवर समाधान मानावे लागले, त्यात तेम्बा बवूमाने 103 चेंडूत सर्वाधिक 52 धावांचे योगदान दिले. अन्य फलंदाजांना मात्र फारसा सूर सापडला नव्हता. शमीला शार्दुल व बुमराह यांनी प्रत्येकी 2 बळी घेत उत्तम साथ दिली. सिराजने 45 धावात 1 फलंदाज बाद केला.
पहिल्या दोन सत्रात 12 गडी बाद
तत्पूर्वी, दुसऱया दिवसाचा खेळ पूर्ण वाया गेल्यानंतर तिसऱया दिवशी पहिल्या दोन सत्रातच दोन्ही संघांचे मिळून एकूण 12 फलंदाज गारद झाले. एकीकडे, 3 बाद 272 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात करणाऱया भारताने उर्वरित 7 फलंदाज गमावले तर आफ्रिकेचे 5 फलंदाजही गारद केले होते.
घोटा मुरगळल्याने बुमराह बराच काळ मैदानावर नव्हता. मात्र, यानंतरही भारताने वर्चस्व कायम राखले. तेम्बा बवूमा व डी कॉक यांची पाचव्या गडय़ासाठी 72 धावांची भागीदारी अपवाद ठरली. डी कॉक खराब फटक्यावर शार्दुलचा चेंडू यष्टीवर ओढवत त्रिफळाचीत झाला तर बुमराहने एका अप्रतिम चेंडूवर एल्गारला यष्टीरक्षक पंतकडे झेल देणे भाग पाडले. शमीने इनकटरवर एडन मॅरक्रमचा त्रिफळा उडवत आपल्या गोलंदाजीतील भेदकता दाखवून दिली. रॅस्सी व्हान डेर डय़ुसेनला सिराजचा तिखट मारा थोपवता आला नाही आणि गलीवर तैनात अजिंक्य रहाणेकडे झेल देत तो तंबूत परतला.
त्यापूर्वी, भारताने 3 बाद 272 या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर एन्गिडीने भेदक मारा साकारत भारतीय फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. कॅगिसो रबाडाची देखील त्याला उत्तम साथ लाभली. रबाडाने केएल राहुलला उसळत्या चेंडूवर पूलचा चुकीचा फटका खेळणे भाग पाडले आणि डी कॉकने सोपा झेल टिपला. रहाणेही यष्टीमागे झेल देत बाद झाला.
रविचंद्रन अश्विन एन्गिडीचा उसळता मारा टाळू शकला नाही आणि केशव महाराजकडे सोपा झेल देत त्याने तंबूचा रस्ता धरला. रिषभ पंतचे (8) बाद होणे चेतेश्वर पुजाराची कार्बन कॉपी ठरली. फॉरवर्ड शॉर्ट लेगवरील क्षेत्ररक्षकाने त्याचा बॅट-पॅड झेल टिपला. बुमराहने थोडीफार फटकेबाजी केली आणि यामुळे भारताला 325 धावांचा टप्पा सर करता आला.
पाय मुरगळल्याने बुमराह काही कालावधीकरिता मैदानाबाहेर
भारताचा आघाडीचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराहला उजवा पाय मुरगळल्याने प्रथमोपचार घेण्यासाठी काही काळ मैदानाबाहेर जावे लागले. दक्षिण आफ्रिकन डावात सहाव्या षटकात गोलंदाजी करत असताना फॉलोअपमध्ये बुमराहचा पाय मुरगळला आणि त्याला बऱयाच वेदना जाणवल्या. यानंतर लगेच त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. त्याच्या ऐवजी श्रेयस अय्यरने क्षेत्ररक्षण केले. नंतर बुमराह पुन्हा मैदानात आला आणि त्याने काही षटके टाकली.
धावफलक
भारत पहिला डाव ः केएल राहुल झे. डी कॉक, गो. रबाडा 123 (260 चेंडूत 17 चौकार, 1 षटकार), मयांक अगरवाल पायचीत गो. एन्गिडी 60 (123 चेंडूत 9 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. पीटरसन, गो. एन्गिडी 0 (1 चेंडू), विराट कोहली झे. मल्डर, गो. एन्गिडी 35 (94 चेंडूत 4 चौकार), अजिंक्य रहाणे झे. डी कॉक, गो. एन्गिडी 48 (102 चेंडूत 9 चौकार), रिषभ पंत झे. डय़ुसेन, गो. एन्गिडी 8 (13 चेंडूत 1 चौकार), रविचंद्रन अश्विन झे. महाराज, गो. रबाडा 4 (5 चेंडूत 1 चौकार), शार्दुल ठाकुर झे. डी कॉक, गो. रबाडा 4 (8 चेंडूत 1 चौकार), मोहम्मद शमी झे. डी कॉक, गो. एन्गिडी 8 (9 चेंडूत 2 चौकार), जसप्रित बुमराह झे. मल्डर, गो. जान्सन 14 (17 चेंडूत 2 चौकार), मोहम्मद सिराज नाबाद 4 (12 चेंडूत 1 चौकार). अवांतर 19. एकूण 105.3 षटकात सर्वबाद 327.
गडी बाद होण्याचा क्रम
1-117 (मयांक, 40.2), 2-117 (पुजारा, 40.3), 3-199 (विराट, 68.2), 4-278 (केएल राहुल, 93.6), 5-291 (रहाणे, 96.4), 6-296 (अश्विन, 97.4), 7-296 (रिषभ, 98.2), 8-304 (शार्दुल, 99.6), 9-308 (शमी, 100.5), 10-327 (बुमराह, 105.3).
गोलंदाजी
कॅगिसो रबाडा 26-5-72-3, एन्गिडी 24-5-71-6, मार्को जान्सन 18.3-4-69-1, वियान मल्डर 19-4-49-0, केशव महाराज 18-2-58-0.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः डीन एल्गार झे. पंत, गो. बुमराह 1 (2 चेंडू), एडन मॅरक्रम त्रि. गो. शमी 13 (34 चेंडूत 3 चौकार), किगन पीटरसन त्रि. गो. शमी 15 (22 चेंडूत 3 चौकार), रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन झे. रहाणे, गो. सिराज 3 (18 चेंडू), तेम्बा बवूमा झे. पंत, गो. शमी 52 (103 चेंडूत 10 चौकार), क्विन्टॉन डी कॉक त्रि. गो. शार्दुल 34 (63 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), वियान मल्डर झे. पंत, गो. शमी 12 (33 चेंडूत 2 चौकार), मार्को जान्सन पायचीत गो. शार्दुल 19 (42 चेंडूत 3 चौकार), कॅगिसो रबाडा झे. पंत, गो. शमी 25 (45 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), केशव महाराज झे. रहाणे, गो. बुमराह 12 (19 चेंडूत 3 चौकार), लुंगी एन्गिडी नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 11. एकूण 62.3 षटकात सर्वबाद 197.
गडी बाद होण्याचा क्रम
1-2 (एल्गार, 0.5), 2-25 (किगन, 7.3), 3-30 (मॅरक्रम, 11.5), 4-32 (डय़ुसेन, 12.5), 5-104 (डी कॉक, 34.1), 6-133 (मल्डर, 42.6), 7-144 (बवूमा, 46.4), 8-181 (जान्सन, 56.6), 9-193 (रबाडा, 61.5), 10-197 (केशव, 62.3).
गोलंदाजी
बुमराह 7.2-2-16-2, सिराज 15.1-3-45-1, शमी 16-5-44-5, शार्दुल ठाकुर 11-1-51-2, रविचंद्रन अश्विन 13-2-37-0.
भारत दुसरा डाव ः केएल राहुल खेळत आहे 5 (19 चेंडूत 1 चौकार), मयांक अगरवाल झे. डी कॉक, गो. जान्सन 4 (14 चेंडूत 1 चौकार), शार्दुल ठाकुर खेळत आहे 4 (5 चेंडूत 1 चौकार). अवांतर 1. एकूण 6 षटकात 1 बाद 16.
गडी बाद होण्याचा क्रम
1-12 (मयांक, 5.1).
गोलंदाजी
रबाडा 3-0-7-0, एन्गिडी 2-1-4-0, जान्सन 1-0-4-1.