भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आघाडीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या दुसऱया लाटेतही भारताची जागतिक व्यापाऱयाच्या क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत लक्षणीय कामगिरी झाली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास विषयावरील संमेलनात देण्यात आली आहे.
सध्याच्या परिस्थितीत भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत इतर मोठय़ा अर्थव्यवस्थेच्या देशांच्या तुलनेत चांगली प्रगती केली आहे. जागतिक व्यवसाय (व्यापार) अहवालात भारताने वस्तु आणि सेवा क्षेत्रात नोंदणीय कामगिरी केली असल्याचे नमूद केले आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीतला व्यापार हा मागच्या तिमाहीपेक्षा 4 टक्के अधिक तर वर्षापूर्वीच्या समान कालावधीतील व्यवसायाच्या तुलनेत 10 टक्के इतका वाढला आहे. भारताने दरम्यानच्या काळात वस्तु, सेवा आयात-निर्यातीत वाढ नोंदवली आहे. चीनमधून मोठय़ा प्रमाणात निर्यात झाली आहे. 2021 पहिल्या तिमाहीत मागच्या वर्षाच्या तुलनेत समान कालावधीत वस्तुंची आयात 45 टक्के आणि सेवांची आयात 14 टक्के वाढली आहे. भारतातून वस्तुंची निर्यात 26 टक्के आणि सेवांची निर्यात 2 टक्के वाढली आहे. 2021 मध्ये जागतिक विकासात चीन आणि अमेरिका हे महत्त्वाची भूमिका बजावतील असेही संमेलनात सांगण्यात आले आहे.