चिपळुणातील अँटीजेन चाचणीला नागरिक, व्यापाऱयांचा प्रतिसाद
प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱयांसाठी गुरूवारपासून सुरू करण्यात आलेल्या अँटीजेन चाचणीच्या पहिल्या दिवशी तपासणी झालेल्या 16 व्यापाऱयांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तत्काळ निदान होऊन उपचार मिळावेत, यासाठी येथे या चाचणीचे दोन कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याचा फायदा होत आहे. गुरूवारी दिवसभरात आलेल्या 35 नव्या कोरोना रूण्ग्नाांमुळे तालुक्यातील बाधितांचा आकडा 1247 वर पोहचला आहे.
तालुक्यात दरदिवशी वाढणाऱया कोरोना रूग्णांमध्ये शहरातीलही अनेक रूग्णांचा समावेश आहे. त्यातच गणेशोत्सवापूर्वी व सणावेळी अनेकांकडून मोडले गेलेले नियम पाहता त्याचा फटका आता बसू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचे तत्काळ निदान होऊन त्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य विभाग, नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पवनतलाव मैदान परिसरात अँटीजेन चाचणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. येथे डॉ. पार्थ मेहता, लॅब टेक्निशियन सारिका गेजगे व अन्य कर्मचारी ठरलेल्या वेळेत 50हून अधिक नागरिकांची तपासणी करत आहेत.
मात्र आता येथे व्यापाऱयांचीही चाचणी केली जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत नागरिक, तर दुपारी 2 ते 4 या वेळेत व्यापाऱयांची तपासणी होणार आहे. व्यापाऱयांच्या तपासणीचा शुभारंभ गुरूवारी झाला. पहिल्या दिवशी 16 जणांची चाचणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. यावेळी कार्यालयीन प्रमुख अनंत मोरे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, व्यापारी संघटनेचे शिरीष काटकर आदी उपस्थित होते.
गुरूवारी सापडलेल्या नव्या 35 रूग्णांमुळे तालुक्यातील बाधितांचा आकडा 1247 वर गेला आहे. यात शहरातील 588, ग्रामीण भागातील 659 रूग्णांचा समावेश आहे. सध्या 291 जणांवर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यातील 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.