भारत-इंग्लंड यांच्यात दुसरी कसोटी आजपासून, विराटसेनेसमोर मुसंडी मारण्याचे आव्हान
चेन्नई / वृत्तसंस्था
इंग्लंडने चेन्नईतील पहिल्या कसोटीत 227 धावांनी प्रचंड मोठा विजय संपादन करत भारताचा ऑस्ट्रेलियन दौऱयातील मालिकाविजयाचा ‘हनिमून’ सफळ संपूर्ण संपुष्टात आणल्यानंतर यजमानांनी आता दुसऱया कसोटी सामन्यासाठी फिरकीला पोषक खेळपट्टीला पसंती दिली आहे. मात्र, इंग्लिश फलंदाज फिरकीही उत्तम खेळू शकत असल्याने हा डाव संघावरच उलटणार की खेळपट्टीचे स्वरुप बदलताना असणारी भारताची अपेक्षा फलद्रूप ठरणार, हे आजपासून खेळवल्या जाणाऱया लढतीत स्पष्ट होईल. पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे.
इंग्लंडने भारताविरुद्ध 4 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहलीचा खेळ नेहमी आव्हानात्मक परिस्थितीतच अधिक बहरतो, या इतिहासाची येथेही पुनरावृत्ती होणार का, हे पहावे लागेल. विराटसह अन्य दिग्गज खेळाडू कसे खेळतात, यावरच भारतीय संघ जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणार का, हे देखील स्पष्ट होईल.
भारताला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी दोन सामने जिंकावे लागतील. शिवाय, एकही पराभव पत्करुन चालणार नाही. इंग्लिश संघ येथील दुसऱया कसोटीत बेन फोक्स या नव्या यष्टीरक्षकासह मैदानात उतरेल तर इंग्लिश संघाच्या रोटेशन पॉलिसीनुसार, जेम्स अँडरसनला विश्रांती दिली जाणार असून स्टुअर्ट ब्रॉड हा प्रतिस्पर्ध्यांचे मुख्य अस्त्र असेल. भारतीय संघासाठी नेहमी कर्दनकाळ ठरलेला मोईन अली येथे खेळणार आहे. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सर्वाधिक बळी घेणाऱया डॉम बेसची जागा तो घेईल.
जोफ्रा आर्चर खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला असून यामुळे गोलंदाजी अष्टपैलू ख्रिस वोक्स त्याची जागा घेईल. पहिल्या कसोटीत धोबीपछाड झाल्यानंतर भारताने चेपॉकवर येथे गडद रंगाची नवी खेळपट्टी अंथरली असून येथे पहिल्या दिवसापासूनच चेंडू वळत राहील, असे संकेत आहेत. यामुळे रविचंद्रन अश्विनला दुसऱया बाजूने उत्तम साथ मिळणे महत्त्वाचे ठरु शकते. दुसऱया बाजूने प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या धावा रोखणे आणि वेळोवेळी ब्रेकथ्रू मिळवून देणे ही अपेक्षा यावेळी असणार आहे.
सध्या पूर्ण तंदुरुस्त असलेला अक्षर पटेल हा दुखापतग्रस्त अष्टपैलू रविंद्र जडेजाची जागा भरुन काढण्यासाठी सज्ज असून अश्विनच्या साथीला दुसरा फिरकी गोलंदाज खेळवणे क्रमप्राप्त असल्याने अक्षर पटेलला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
कुलदीपबाबत साशंकता कायम
यापूर्वी, पहिल्या कसोटी सामन्यात धोबीपछाड झाल्यानंतर त्यात कुलदीपला न खेळवल्याबद्दल कर्णधार विराटसह संघव्यवस्थापनावर बरीच टीका झाली. पण, विराटने त्यानंतरही या निर्णयाचे समर्थन केले होते. आता दुसऱया लढतीतही कुलदीपला खेळवले जाणार का, याबद्दल साशंकता कायम आहे. कुलदीपने आतापर्यंतच्या छोटय़ा कारकिर्दीत 6 कसोटी सामने खेळले आहेत. वॉशिंग्टन सुंदरच्या तुलनेत कुलदीप अधिक आक्रमक मानला जातो. मात्र, हार्दिक पंडय़ाही आता उपलब्ध असल्याने त्याला खेळवले जाणार का, याबद्दल संदिग्धता आहे.
20 वर्षीय वॉशिंग्टन सुंदर भविष्यात उत्तम अष्टपैलू म्हणून नावारुपाला येऊ शकतो. मात्र, सध्याच्या घडीला स्पेशालिस्ट तिसरा फिरकीपटू म्हणून खेळवण्याइतपत तो उत्तम नाही, असा रवी शास्त्री यांचा होरा आहे. दुसरीकडे, हार्दिक पंडय़ा फिरकीपटूंचा उत्तम समाचार घेऊ शकतो आणि त्याचप्रमाणे 8 ते 10 षटके सहजपणे भेदक मारा करु शकतो. गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर पाचव्या गोलंदाजाकडून इतकीच माफक अपेक्षा असते. आजच्या लढतीत देखील नाणेफेक महत्त्वाची ठरणार असून त्यावर बरेच चित्र अवलंबून असू शकते.
संभाव्य संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, हार्दिक पंडय़ा, मयांक अगरवाल, केएल राहुल, वृद्धिमान साहा, शार्दुल ठाकुर.
इंग्लंड ः जो रुट (कर्णधार), डॉमिनिक सिबली, रोरी बर्न्स, ऑलि पोप, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, बेन फोक्स (यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, ओली स्टोन.
सामन्याची वेळ: सकाळी 9.30 पासून.
कोटस
जोफ्रा आर्चर खेळू शकणार नाही, हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. पण, तो दुखापतीतून सत्त्वर सावरेल आणि तिसऱया कसोटी सामन्यासाठी संघात उपलब्ध असेल, अशी आशा आहे.
-इंग्लिश कर्णधार जो रुट
पाहुण्या इंग्लिश संघात 4 व्यापक फेरबदल
जो रुटच्या इंग्लंड संघात 4 व्यापक फेरबदल केले गेले असून जेम्स अँडरसनऐवजी स्टुअर्ट ब्रॉडला तर डॉम बेसऐवजी अनुभवी मोईन अलीला 12 सदस्यीय संघात समाविष्ट केले गेले आहे. जोस बटलर पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतला असून त्याच्याऐवजी बेन फोक्स यष्टीरक्षक-फलंदाज या नात्याने जबाबदारी सांभाळेल. गोलंदाजी अष्टपैलू ख्रिस वोक्स व नवोदित गोलंदाज ओली स्टोन यांच्यात अंतिम जागेसाठी चुरस असेल.
‘आम्ही संघात 4 बदल करत आहोत. अँडरसन, जोफ्रा, जोस, डॉम बेस बाहेर असतील तर फोक्स, अली, स्टोन, ब्रॉड, वोक्स संघात परतत आहेत’, असे कर्णधार जो रुटने आभासी पत्रकार परिषदेत नमूद केले. डॉम बेसने पहिल्या डावात विराटची प्राईज विकेट मिळवली होती. यात त्याते 5 बळी घेतले. पण, नंतर दुसऱया डावात तो निष्प्रभ ठरला होता. त्याच्या जागेवर मोईन अली पुनरागमन करेल. मोईन अलीने ऑगस्ट 2019 नंतर संघात परतण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आर्चर संघात नसल्याने त्याची जागा स्टोनला मिळणार की ख्रिस वोक्सला हे सामन्याच्या दिवशी स्पष्ट होईल. वार्विकशायरच्या 27 वर्षीय स्टोनने 2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणात 29 धावात 3 बळी, असे पृथक्करण नोंदवले. पण, नंतर तो पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला होता.
अजिंक्य रहाणे म्हणतो, माझी मागील 15 कसोटीतील कामगिरी पहा!
सातत्यपूर्ण फलंदाजीत अभाव आहे, अशी टीका झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने आपल्या मागील 15 कसोटी सामन्यातील कामगिरीचे अवलोकन करावे, असे प्रतिपादन आभासी पत्रकार परिषदेत केले. इंग्लंडविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर तो बोलत होता. कर्णधार विराट कोहलीने देखील यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्यानंतर रहाणेचे समर्थन केले होते.
‘आम्ही मायदेशात तब्बल दोन वर्षांनंतर खेळत आहोत. आमची शेवटची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होती. तेथील माझ्या धावा तुम्ही पाहू शकता’, असे रहाणे पुढे म्हणाला. रहाणेने 2019 मधील त्या मालिकेत 2 डावात 59 व 115 धावांची खेळी साकारली होती.
नेतृत्वात बदल असल्याने तुझी देहबोली नकारात्मक होती का, या प्रश्नावर रहाणेने स्पष्टपणे नकारार्थी उत्तर दिले. ‘काही वेळा आपल्या खेळात तितकीच उर्जा असत नाही. पण, याचा अर्थ असा होत नाही की, नेतृत्व बदलामुळे तसे होते. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे विराट हा आमचा कर्णधार आहे आणि यापुढेही तोच कर्णधार असणार आहे. पण, असे खोदून विचारण्यामागे काही मसाला मिळेल का, असा उद्देश असल्यास आपल्या हाती काहीही लागणार नाही’, असे त्याने स्पष्टपणे नमूद केले. रोहित शर्माचा खराब फॉर्म तत्कालिक असून त्याला केवळ एका मोठय़ा खेळीची प्रतीक्षा आहे, असे रहाणे शेवटी म्हणाला.